‘लिमिटेड ट्रेड डील’साठी अमेरिकेला भारताचा संतुलित प्रस्ताव

नवी दिल्ली – अमेरिकेच्या निवडणुकीनंतर भारत आणि अमेरिकेमध्ये ‘लिमिटेड ट्रेड डील’ होईल असे संकेत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत. मुक्त व्यापार कराराचे अंतिम ध्येय समोर ठेवून दोन्ही देशांमध्ये सुरुवातीला एक मर्यादित व्यापार करार व्हावा असा, प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या मर्यादित व्यापार करारासाठी भारताने अमेरिकेसमोर अतिशय चांगला आणि संतुलित प्रस्ताव ठेवला आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड’च्या (आयआयएफटी) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वाणिज्यमंत्री गोयल बोलत होते.

'लिमिटेड ट्रेड डील'

अमेरिकेबरोबर मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. जुलै महिन्यात अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांच्याबरोबर याविषयी गोयल यांनी चर्चा केली होती. मात्र मुक्त व्यापार करारावर अजून दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली नाही. मात्र मुक्त व्यापार करार करण्यापूर्वी दोन्ही देश मर्यादित व्यापार करार करण्यासाठी सहमत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये याविषयी चर्चा सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. यापार्श्वभूमीवर गोयल यांनी दिलेली माहिती लक्षवेधी ठरते.

अमेरिका बरोबर मर्यादित स्वरूपाचा व्यापार करार करण्यासाठी भारताने जो प्रस्ताव ठेवला आहे, त्याविषयी दोन्ही देशांमध्ये जवळ जवळ सर्व काही निश्चित झाले आहे. भारत उद्याच हा करार अमेरिकेबरोबर करण्यासाठी तयार आहे. मात्र कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेच्या सरकारचे सर्व काम घरातून सुरू आहे आणि भारतात सर्व सरकारी कामे सरकारी पद्धतीने सुरू आहेत. यामुळे हा करार करण्यासाठी अमेरिकेकडून विलंब लागत आहे. कदाचित अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकांनंतर हा करार होईल. तोपर्यंत वाट पाहावी लागेल, असे गोयल म्हणाले.

अमेरिकेबरोबर हा करार झाल्यास भारताला आणि अमेरिके दोघांना याचा चांगला लाभ होईल, असे गोयल यांनी स्पष्ट केले. तसेच देशातील कृषी, डेअरी, सूक्ष्म, लघु उद्योग आणि कुटीर उद्योगाच्या हिताच्या संरक्षणाचे ही वाणिज्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. कोरोनाव्हायरसच्या संकटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भारत परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि निर्यातदारांना व्यापारी संधी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली करीत आहे. युरोपीय महासंघ आणि ब्रिटनबरोबर ही भारताच्या मुक्त व्यापार करारासाठी हालचाली सुरू आहेत. ब्रिटनबरोबरही भारताने मुक्त व्यापार करार करण्याआधी ‘प्रिफरेन्शिअल ट्रेड अँग्रीमेंट’ (पीटीए) प्रस्ताव ठेवला आहे.

leave a reply