सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनल्यानंतर भारताची सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्त्वावरील दावेदारी भक्कम होईल

-संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘पॉप्युलेशन डिव्हिजन'चे डायरेक्टर जॉन विल्मथ

संयुक्त राष्ट्रसंघ – पुढच्या वर्षी चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानंतर देशात जोरदार चर्चा सुरू झाली असून वाढत्या जनसंख्येमुळे निर्माण होणारे प्रश्न देशाला ग्रासतील, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पण वाढत्या जनसंख्येचे काही लाभ देशाला मिळतील, हे काहीजण लक्षात आणून देत आहेत. पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्यपदावरील दावेदारी अधिक भक्कम होईल, असा दावा करण्यात येत आहे.

Security-Councilहा अहवाल तयार करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘पॉप्युलेशन डिव्हिजन’चे डायरेक्टर जॉन विल्मथ यांनी सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्त्वाचा मुद्दा मांडला. सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनल्यानंतर भारताचा काही गोष्टींवरील दावा भक्कम होणार आहे. सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्त्व हा देखील त्याचा भाग ठरतो, असे भारतीयांना खूश करणारे उद्गार विल्मथ यांनी काढले आहेत. याबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघातील भारताला व्यापक भूमिका पार पाडण्याची संधी मिळू शकेत, असे संकेत विल्मथ यांनी दिले. दरम्यान, सध्या भारताची लोकसंख्या 1.412 अब्ज इतकी आहे. तर चीनची लोकसंख्या 1.426 वर आहे.

2023 साली भारत चीनला मागे टाकून सर्वाधिक जनसंख्या असलेला देश बनेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. मुख्य म्हणजे भारतीय जनसंख्येतील तरुणांचा मोठा हिस्सा ही निर्णायक बाब ठरणार आहे. याचा फार मोठा फायदा भारताच्या अर्थकारणाला मिळेल. त्याचवेळी जनसंख्येच्या या वाढीबरोबरच निर्माण होणाऱ्या आव्हानांचाही सामना देशाला करावा लागेल. यामध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक विकासाला चालना देऊन रोजगारनिर्मितीचा वेग वाढविण्याच्या आव्हानाचा समावेश आहे. याबरोबरच जनसंख्येच्या वाढीबरोबरच आवश्यक असलेल्या शिक्षण व आरोग्यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय देशाला समोर ठेवावे लागेल.

हे सारे करीत असताना, भारताला आपली लोकसंख्या नियंत्रित करावी लागेल. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने टोकाची पावले उचलली होती, त्याचे दुष्परिणाम समोर आले असून चीनमध्ये वयोवृद्धांची संख्या जगाच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढली आहे, याकडे जॉन विल्मथ यांनी लक्ष वेधले. त्या तुलनेत भारतात ही प्रक्रिया सहजतेने होत असून त्यामुळे चीनला भेडसावणारी समस्या भारताला त्या प्रमाणात जाणवणार नाही, असे विल्मथ यांनी म्हटले आहे.

leave a reply