भारताच्या संरक्षणदलप्रमुखांचा चीनला खरमरीत इशारा

नवी दिल्ली – भारत आणि चीनमधील लडाखच्या ‘एलएसी’वरुन सुरू असलेल्या सीमावादावरील ८व्या फेरीची चर्चाही कुठल्याही सहमतीशिवाय पार पडली. या चर्चेत भारताने एप्रिल महिन्याच्या आधीची परिस्थिती नव्याने प्रस्थापित व्हावी, अशी मागणी लावून धरली. चीन मात्र ते मानायला तयार नसून उलट भारतानेच सैन्य माघार घ्यावी, असा चीनचा हट्ट आहे. या चर्चेच्या आधी भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चीनला ‘एलएसी’वरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्‍न केल्यास भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा खरमरीत इशारा दिला होता.

भारताने लडाखच्या ‘एलएसी’अर तैनात केलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मागे घ्यावी, असा प्रस्ताव चीनने दिला होता. मात्र ‘एलएसी’वर एप्रिल महिन्याच्या आधीची परिस्थिती, प्रस्थापित झाल्याखेरीज चीनच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या जाणार नाही, असे भारताने चीनला ठणकावले. त्यामुळे अपेक्षेनुसार, सीमावादावरील चर्चेची ही आठवी फेरी देखील हा वाद सोडविण्यात अपयशी ठरली. ही चर्चा सुरू होण्याच्या आधी भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी तसेच संरक्षणदलप्रमुखांनी चीनला कडक शब्दात इशारा दिला होता.

भारत शांतीप्रिय देश आहे. मात्र भारत आपल्या सार्वभौमत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले होते. वेगळ्या शब्दात भारताला गृहित धरण्याची चूक चीनने करू नये, असे संरक्षणमंत्र्यांनी चीनला बजावले आहे. त्याच्याही पुढे जाऊन संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चीनला अधिक खरमरीत भाषेत संदेश दिला. लडाखच्या ‘एलएसी’वर चीनने दु:साहस केले तर ज्याची कल्पनाही करता येणार नाही, अशा परिस्थितीचा सामना चीनच्या लष्कराला करावा लागेल, असे जनरल रावत यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुठल्याही प्रकारचा बदल आम्हाला मान्य नाही व याबाबतची भारतीय लष्कराची भूमिका अत्यंत सुस्पष्ट आहे, असे जनरल रावत पुढे म्हणाले.

लडाखमध्ये दिर्घकाळ वास्तव्याची तयारी चीनच्या लष्करानेही केली आहे. इथल्या कडक हिवाळ्यासाठी आवश्यक असलेले कपडे चीनने आपल्या जवानांना पुरविल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र त्याच्या आधी इथल्या हिवाळ्यात कित्येक चिनी जवान आजारी पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, चीनने ही तयारी केल्याचे दिसत आहे. असे असले तरी, भारतीय सैन्य चीनच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत असून इथे संघर्ष भडकला तर भारतीय सैनिक चीनची खोड मोडतील, ही बाब पाश्चिमात्य सामरिक विश्लेषकही मान्य करीत आहेत. त्याचवेळी चीनच्या अरेरावीला लष्करी व राजनैतिक पातळीवर भारताने जबरदस्त प्रत्युत्तर दिल्याचे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. याचा परिणाम दिसू लागला असून चीनच्या छोट्या शेजारी देशांनीही भारताबरोबरील सामरिक सहकार्य वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे तर, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांनी भारताबरोबर अत्यंत महत्त्वाचे लष्करी करार करुन चीनवरील सामरिक दडपण अधिकच वाढविले आहे. यामुळेच भारताला सहज पराभूत करण्याच्या धमक्या देणार्‍या चीनच्या भाषेत मोठा बदल झाल्याचे पहायला मिळत आहेत.

leave a reply