देशाकडील परकीय गंगाजळी ६०८ अब्ज डॉलर्सवर

मुंबई – देशाच्या परकीय गंगाजळीत एका आठवड्यात ३.०७ अब्ज डॉलर्सने वाढून ६०८.०८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. सध्या भारत सर्वाधिक परकीय गंगाजळी असलेल्या जगातील चार देशांमध्ये सामील आहे. भारत आणि रशिया एकत्रितपणे या चौथ्या स्थानावर आहेत.

११ जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाकडील परकीय गंगाजळी वाढून ६०८ अब्ज डॉलर्सच्या पुढे पोहोचली. ४ जून रोजी संपलेल्या आठवड्यात हीच परकीय गंगाजळी ६०५ अब्ज डॉलर्स इतकी होती. परकीय गंगाजळीमध्ये असलेल्या परकीय चलनसाठ्यामध्ये २.५६७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. तसेच सोन्याच्या साठ्याचे मुल्य ४९ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढले आहे. सध्या देशाकडील एकूण सोन्याच्या साठ्याचे मूल्य ३८.१०१ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे.

कोरोना काळातही देशाकडील परकीय गंगाजळी सातत्याने वाढत असून हे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे लक्षण आहे. सध्या देशाकडे असलेल्या परकीय गंगाजळीतून देशाची एक वर्षांची आयात मालाची गरज भागवता येऊ शकते. मे महिन्याच्या अखेरीस भारताकडील परकीय गंगजळी ६०० अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीच्या पुढे पोहोचली. हा एक ऐतिहासीक टप्पा होता. १९९१ साली भारताकडे सहा अब्ज डॉलर्सपेक्षा कमी परकीय गंगाजळी शिल्लक होती व अर्थव्यवस्थेच्या गरजा भागविण्यासाठी देशाला सोने गहाण ठेवावे लागले होते. या स्थितीतून भारताची अर्थव्यवस्था आता खूपच मजबूत स्थितीत पोहोचली आहे.

leave a reply