भारताची प्रगती जगासाठी आशादायक बाब ठरते

बालीतील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचा संदेश

बाली – मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारत सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती करीत आहे. २०१४ सालानंतर भारतात सुमारे ३२ कोटी बँक खाती उघडण्यात आली असून ही संख्या अमेरिकेच्या जनसंख्येहून अधिक आहे. भारताने तीन कोटी जणांना स्वतःचे घर उभे करून दिले असून ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या जनसंख्येहून अधिक ठरते. भारतात होणाऱ्या डिजिटल व्यवहारांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. स्मार्टफोन डाटाचा वापर, आयटी आऊटसोर्सिंग आणि औषधनिर्मिती क्षेत्रात भारत आघाडीवर आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी बाली येथे भारतीय समुदायासमोर देशाच्या प्रगतीचा आलेख मांडून ही जगासाठी आश्वासक बाब बनल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

G20 summit: PM Modi in Baliइंडोनेशियाची राजधानी बाली येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीचा दाखला देऊन आत्ताचा भारत प्रचंड वेगाने प्रगती करीत असून त्याची व्याप्तीही प्रचंड असल्याची जाणीव करून दिली. आत्ताचा भारत छोट्या नाही तर भव्य गोष्टींवर विश्वास ठेवणारा आहे. म्हणूनच भारत २१ व्या शतकात जगासाठी आशेचा किरण बनला आहे, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी इंडोनेशिया, विशेषतः बालीबरोबरील भारताच्या पूर्वापार संबंधांचा दाखला दिला. दोन्ही देशांच्या व्यापारी व सांस्कृतिक सहकार्याला फार मोठा इतिहास लाभलेला आहे, याकडे पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले.

तसेच भारताची प्रगती जगासाठी चिंतेचा विषय ठरत नाही तर भारताचा विकास ही जगासाठी उपकारक ठरणारी बाब आहे. भारताच्या प्रगतीमुळे दक्षिण आशियाई क्षेत्राला मोठा लाभ होत आहे व पुढच्या काळात भारताच्या प्रगतीचे अधिकाधिक लाभ या क्षेत्राला मिळत राहतील, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी यावेळी दिली. इंडोनेशियातील भारतीयांना पंतप्रधानांनी यावेळी प्रवासी भारतीय दिवसाचे आमंत्रण दिले. यात सहभागी होण्यासाठी येताना सोबत इंडोनेशियातील मित्रांना घेऊन या, असा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे.

leave a reply