चीनवरील दडपण कायम ठेवण्यासाठी अमेरिका व मित्रदेशांचे ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात व्यापक नौदल सराव

टोकिओ/गुआम/बीजिंग – अफगाणिस्तानचा मुद्दा पुढे करून चीन तैवानसह ‘आसियन’ देशांवरील दडपण वाढवित असतानाच अमेरिकेने आपल्या मित्रदेशांसह ‘इंडो-पॅसिफिक’च्या मुद्यावर आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. गेल्या काही आठवड्यात अमेरिकेने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात एकामागोमाग एक नौदल सराव सुरू केले असून हे सराव चीनवरील दबाव कायम ठेवण्याच्या धोरणाचा भाग ठरतो. जपाननजिक अमेरिकेच्या दोन ‘सुपरकॅरिअर्स’ व ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ आपल्या ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’सह सराव करीत आहे. त्याचवेळी गुरुवारपासून अमेरिकेच्या गुआम तळानजिक ‘क्वाड’ गटातील देशांचा ‘मलाबार 21’ या नौदल सरावालाही प्रारंभ झाला आहे.

गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीन पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या पाडावाचा वापर करून चीनने तैवान व आग्नेय आशियातील इतर देशांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी साऊथ चायना सी क्षेत्रातील विस्तारवादी कारवायांनाही गती दिली आहे. चीनच्या या कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व सहकारी देशांनीही इंडो-पॅसिफिकमधील हालचालींना वेग दिल्याचे दिसत आहे.

ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’ तिच्या ‘कॅरिअर स्टाईक ग्रुप’सह गेल्या महिन्यातच इंडो-पॅसिफिकमध्ये दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रिटीश नौदलाच्या ताफ्याने जपानमध्ये मुक्काम ठोकला असून जपान व अमेरिकेच्या नौदलाबरोबर ‘ट्रायलॅटरल नॅव्हल एक्सरसाईज’मध्ये भाग घेतला. त्यानंतर ईस्ट चायना सी क्षेत्रात अमेरिका व ब्रिटनचा स्वतंत्र नौदल सराव सुरू झाला आहे. यात अमेरिकेची ‘युएसएस अमेरिका’ व ‘युएसएस कार्ल विन्सन’ या दोन सुपरकॅरिअर्स व त्यांचा स्ट्राईक ग्रुप सहभागी झाला आहे. दोन्ही नौदलांच्या 20हून अधिक युद्धनौकांसह जवळपास 80हून अधिक प्रगत लढाऊ विमाने नौदल सरावाचा भाग असल्याचे सांगण्यात येते.

हा सराव सुरू असतानाच गुरुवारपासून अमेरिकेच्या गुआम या संरक्षणतळानजिक ‘क्वाड’ गटाच्या मलाबार या नौदल सरावाला सुरुवात झाली आहे. या सरावात अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया व जपानच्या नऊ युद्धनौका, पाणबुडी, हेलिकॉप्टर्स तसेच मेरिटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट्स सहभागी आहेत. चार दिवस चालणाऱ्या या व्यापक नौदल सरावात ‘अँटी सबमरिन वॉरफेअर’सह अँटी सरफेस व अँटी एअर वॉरफेअर तसेच ‘टॅक्टिकल एक्सरसाईजेस’चा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘मलाबार’ हा नौदल सराव 1992 सालापासून आयोजित करण्यात येत असून यावेळी आयोजित करण्यात आलेला सराव 25वा असल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

जपान व गुआमनजिक सुरू असणाऱ्या व्यापक नौदल सरावांपूर्वी गेल्या महिन्यात अमेरिका व ऑस्ट्रेलियादरम्यान ‘तालिस्मान सॅबर 21’ हा द्विपक्षीय नौदल सराव पार पडला. त्यापाठोपाठ गेल्याच आठवड्यात अमेरिका व दक्षिण कोरियामध्येही युद्धसरावाला सुरुवात झाली आहे. या सर्व सरावांच्या माध्यमातून अमेरिका व मित्रदेशांचे नौदल मोठ्या प्रमाणावर ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात तैनात आहे. त्यातून चीनला योग्य संदेश गेल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

leave a reply