चीनच्या विमानांची तैवानच्या हद्दीतील घुसखोरी वाढली

घुसखोरी वाढलीतैपेई – चीनच्या दबावासमोर झुकणार नसल्याची घोषणा करणार्‍या तैवानच्या सुरक्षेला ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ने पुन्हा आव्हान दिले. चीनच्या टेहळणी विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली आहे. गेल्या आठवड्याभरात चीनच्या टेहळणी विमानांची ही पाचवी घुसखोरी ठरते. तैवानने देखील आपली लढाऊ विमाने रवाना करून चीनच्या टेहळणी विमानांना माघार घेण्यास भाग पाडले. पण या घटनेमुळे सदर हवाई क्षेत्रातील तणाव वाढला होता.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी चीनच्या ‘शांक्सी वाय-८’ या टेहळणी विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स झोन – एडीझेड’ अर्थात हवाईसुरक्षा क्षेत्रात घुसखोरी केली. तैवानच्या डाँगशा बेटांवरुन चीनच्या या विमानांनी उड्डाण केले. पाणबुडीभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या या चिनी टेहळणी विमानांना पिटाळण्यासाठी तैवानने आपली लढाऊ विमानांने रवाना केली. त्याचबरोबर रेडिओद्वारे संदेश पाठवून चिनी विमानांना वेळीच माघार घेण्यासाठी इशारा दिल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.

घुसखोरी वाढलीफेब्रुवारी महिन्यातच चीनच्या लढाऊ, टेहळणी आणि बॉम्बर विमानांनी तैवानच्या हवाई क्षेत्रात केलेली ही पाचवी घुसखोरी ठरते. याआधी १, २, ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी चीनच्या विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केले होते, असा आरोप तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तर त्याआधी जानेवारी महिन्यात २३ आणि २४ जानेवारी रोजी चीनने सलग दोन दिवस किमान दहा विमानांचा ताफा तैवानच्या हद्दीत घुसविला होता.

राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर चीनच्या आक्रमकतेत वाढ झाल्याचे दिसत आहे. तैवानच्या हवाईहद्दीत विमाने रवाना करण्याबरोबर चीनने उघडपणे तैवानला तसेच तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देणार्‍या व्यक्ती, संघटना तसेच देशांना धमकावणे सुरू केले आहे. तैवानच्या स्वातंत्र्याचे प्रयत्न म्हणजे युद्धाची धमकी असल्याचे चीनने बजावले होते. तसेच तैवानबाबत बायडेन प्रशासनाची आपल्याला अजिबात पर्वा नसल्याचे चीनने दोन आठवड्यांमध्ये दाखवून दिले आहे.

घुसखोरी वाढलीतैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तर तैवान स्वतंत्र देश असल्याची ठाम भूमिका या देशाच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी स्वीकारली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, अमेरिकेने तैवानी सरकारने स्वीकारलेल्या या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र बायडेन प्रशासनाने अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर तैवानबाबतच्या अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

दोन दिवसांपूर्वी चीनच्या दबावामुळे गयाना या लॅटिन अमेरिकी देशानेही तैवानबरोबरच्या सहकार्यातून माघार घेतली होती. बायडेन प्रशासनाची चीनबाबतची भूमिका ट्रम्प यांच्यापेक्षा खूपच वेगळी असले, याची जाणीव झाल्याने लॅटिन अमेरिकन देशांनी तैवानबाबत हा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे पुढच्या काळात बायडेन प्रशासन चीनची मनमानी खपवून घेणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

leave a reply