राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील महागाईदर पुन्हा 10 टक्क्यांवर

लंडन – रशिया-युक्रेन युद्ध, इंधनाच्या दरांनी गाठलेली उच्चांकी पातळी व राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील महागाईने पुन्हा एकदा 10 टक्क्यांची मर्यादा ओलांडली. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमधील महागाई निर्देशांक 10.1 टक्के नोंदविण्यात आल्याची माहिती बुधवारी ब्रिटनच्या ‘ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स’ने दिली. अवघ्या तीन महिन्यांच्या कालवधीत ब्रिटनमधील महागाईने पुन्हा एकदा 10 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात ब्रिटनमधील महागाईचा दर 10.1 टक्के असा नोंदविण्यात आला होता. ब्रिटनमधील हा महागाईचा भडका 1982 सालानंतरचा उच्चांक ठरला आहे.

इंधनासह अन्नधान्य, दूध, अंडी, तयार खाद्यपदार्थ यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ विक्रमी महागाईस कारणीभूत ठरली आहे. दूधाच्या दरात 40 टक्क्यांहून अधिक भर पडली असून कडधान्ये व अंड्याचे दर 20 टक्क्यांहून अधिक भडकले आहेत. इंधनाच्या दरांमध्ये होणारी वाढही कायम असून वीजबिले सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. वाढत्या महागाईसाठी रशिया-युक्रेन युद्ध, इंधन बाजारपेठेतील घडामोडी यासह ब्रिटनमधील राजकीय उलथापालथही कारणीभूत ठरल्याचा दावा काही विश्लेषक करीत आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रुस यांनी गेल्या आठवड्यात मिनी बजेट सादर केले होते. त्यावर सर्वसामान्य नागरिकांसह वित्तीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. घरांसह इतर अनेक घटकांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्याचे परिणाम महागाई निर्देशांकावर दिसून आले आहेत. पंतप्रधान ट्रुस यांनी अर्थमंत्र्यांची हकालपट्टी करून मिनी बजेट मागे घेतले असले तरी त्याचे परिणाम भरून येण्यास काही काळ जावा लागेल, असे सांगण्यात येते.

महागाई रोखण्यासाठी ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात सातत्याने वाढ करण्याचे धोरण राबविले आहे. मात्र त्याला फारसे यश मिळत नसल्याचे नव्या आकडेवारीवरून दिसून येते. ‘बँक ऑफ इंग्लंड’ चे गव्हर्नर अँड्य्रू बेली यांनी, युद्धाची आर्थिक किंमत मोजावी लागते असे सांगून पुढील काही महिन्यात ब्रिटनमध्ये विक्रमी महागाई कडाडलेली असेल, असा इशारा यापूर्वीच दिला होता. त्यामुळे ब्रिटीश जनतेला पुढील काही महिने ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस’ला तोंड द्यावे लागेल, असे दिसत आहे.

leave a reply