रशियापुरस्कृत ‘सीएसटीओ’ गटाकडून ताजिकिस्तानमध्ये युद्धसराव

'CSTO' group दुशांबे/मॉस्को – रशियाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन’च्या(सीएसटीओ) सदस्य देशांनी सोमवारपासून ताजिकिस्तानमध्ये युद्धसरावाला सुरुवात केली. या सरावात रशियासह मध्य आशियाई देशांचे हजाराहून अधिक जवान तसेच लढाऊ विमाने व ड्रोन्स सहभागी झाली आहेत. नाटोसह पाश्चिमात्य देश रशियावरील दडपण वाढविण्यासाठी युरोपातील तैनाती वाढवित असताना हा सराव महत्त्वाचा मानला जातो.

CSTOसोमवारी ताजिकिस्तान या मध्य आशियाई देशात ‘रुबेझ-2022’ सरावाला सुरुवात झाली. ‘सीएसटीओ’ देशांनी उभारलेल्या ‘कलेक्टिव्ह रॅपिड डिप्लॉयमेंट फोर्सेस’ची तैनाती व युद्धसंबंधित हालचाली तसेच प्रशिक्षण असे या सरावाचे स्वरुप असणार आहे. यात रशियाच्या 600 हून अधिक जवानांचा सहभाग आहे.

रशियाव्यतिरिक्त ताजिकिस्तान, किरगिझिस्तान, कझाकस्तान, बेलारुस, आर्मेनिया या देशांच्या लष्करी तुकड्या सरावात सहभागी झाल्या आहेत. सरावात 300हून अधिक सशस्त्र वाहने, लढाऊ विमाने, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही आठवड्यांपूर्वी या गटातील ताजिकिस्तान व किरगिझिस्तान या देशांमध्ये संघर्षाची ठिणगी उडाली होती. हा संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी रशियाला मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर काही दिवसातच संयुक्त सरावाचे आयोजन होणे ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

leave a reply