अमेरिका व युरोपातील महागाईचा युक्रेन युद्धाशी संबंध नाही

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिका आणि युरोपिय देशांमधील महागाईचा भडका उडल्याचे दिसत आहे. या देशांमधील महागाई विक्रमी स्तरावर पोहोचली असून जनता हैराणझाली आहे. युक्रेनवर हल्ला चढविणारे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन या परिस्थितीला जबाबदार असल्याचे आरोप अमेरिका व युरोपिय देशांचे नेते करीत आहेत. या आक्षेपांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी उत्तर दिले. युक्रेनचे युद्ध नाही तर अमेरिकेने आत्तापर्यंत स्वीकारलेली चुकीची आर्थिक धोरणे या देशातील महागाईला जबाबदार आहेत. तर युरोपिय महासंघाने इंधनाबाबत भविष्याचा विचार न करता आखलेली संकुचित धोरणे या देशांमधील महागाईला कारणीभूत ठरल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन पुढे म्हणाले.

कोरोनाची साथ आल्यानंतरच्या आर्थिक संकटाला तोंड देताना जगभरातील सर्वच देशांना अर्थव्यवस्थेतील निधीचा पुरवठा वाढवावा लागला होता. त्यासाठी अधिक पैसे उपलब्ध करून देण्याची गरज होती व प्रत्येक देशाने यासाठी अधिक चलनी नोटा छापल्या. रशियाला देखील तसेच करावे लागले, पण रशियाने अत्यंत दक्षतेने याबाबतचे आपले धोरण आखले हेोते. अमेरिकेने ही सावधगिरी न दाखवता गेल्या दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधीत आपल्या अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा 38 टक्क्यांनी अर्थात 5.9 ट्रिलियन डॉलर्सनी वाढविला, ही बाब रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्षात आणून दिली.

इतक्या प्रचंड प्रमाणात पैसे छापण्याचा निर्णय आज अमेरिकेत महागाई भडकवित आहे. त्याचा युक्रेनच्या युद्धाशी संबंध नाही, असा टोला रशियन राष्ट्राध्यक्षांनी लगावला. आमच्या अमेरिकन मित्रांनी घोडचूका करून ठेवलेल्य आहेत. त्याचे खापर फोडण्यासाठी ते रशियाचा वापर करीत आहेत, अशी टीका राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केली. तर इंधनाबाबत नाटोचे मध्यवर्ती कार्यालयअसलेल्या ब्रुसेल्सचे धोरण राबविण्याची चूक युरोपिय देशांनी केली. भविष्याचा विचार न करता आखलेले इंधनविषयक धोरण युरोपिय देशांमध्ये महागाई भडकविणारे ठरले. त्याचाही युक्रेनच्या युद्धाशी संबंध जोडता येणार नाही, असे रशियन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले.

सध्या जगासमोर खड्या ठाकलेल्या आर्थिक तसेच इंधनविषयक समस्यांना रशिया जबाबदार नाही. तर प्रत्येक गोष्ट इतर गोष्टींशी जोडलेली असते, हे लक्षात न घेणे हीच अमेरिका व युरोपिय देशांची मूळ समस्या असल्याचा दावा व्लादिमिर पुतिन यांनी केला. रशियाने पाश्चिमात्यांना याची आधीच पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे आज युरोपातील काही नेत्यांना उद्भवलेली ही परिस्थिती म्हणजे आकस्मिक संकट असल्याचे वाटत असले, तरी रशियाने याचे भान देण्याचा फार आधीच प्रयत्न केला होता. म्हणूनच अमेरिका व युरोपिय देशांवर आलेल्या संकटाचा रशियाच्या डोंबासवरील कारवाईशी कुठल्याही प्रकारे संबंध जोडता येणार नाही, असे सांगून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्यावरचे आरोप धुडकावून लावले.

leave a reply