इस्रायलला स्वसंरक्षणासाठी इराणवर कारवाईचा संपूर्ण अधिकार आहे

- इस्रायलचे पंतप्रधान बेनेट

जेरूसलेम – अण्वस्त्रसज्जतेपासून इराणला रोखण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक वाटाघाटींना इस्रायलचा विरोध नाही. पण दिलेल्या मुदतीत या वाटाघाटींना यश मिळाले नाही, तर स्वसंरक्षणासाठी इस्रायलला इराणवर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सहमती झाली नाही तरी इस्रायल एकट्याने इराणवर ही कारवाई करू शकतो, असा नवा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमावरून गंभीर इशारे देणाऱ्या अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांबरोबर झालेल्या भेटीत इस्रायलच्या पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडली.

bennett iaea grossiइराणकडील संवर्धित युरेनियमच्या साठ्यात 18 पट वाढ झाल्याची चिंता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. 2015 साली झालेल्या मूळ अणुकराराच्या तुलनेत इराणच्या अणुप्रकल्पातील ही घडामोड अतिशय गंभीर असल्याचे आयोगाने म्हटले होते. त्याचबरोबर इराणने अणुकार्यक्रमाबाबतच्या काही प्रश्नांबाबत समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची तक्रार अणुऊर्जा आयोगाने केली होती. यामुळे इराणकडे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्य असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला होता.

याला चार दिवस उलटत नाही तोच, अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी इस्रायलचा दौरा करून पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. इराणच्या अणुकार्यक्रमातील या धोकादायक बदलांबाबत अणुऊर्जा आयोगाच्या ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’नी स्पष्ट भूमिका स्वीकारावी, असे आवाहन इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशांनी इराणसह सुरू केलेल्या राजनैतिक वाटाघाटींना इस्रायलचा विरोध नसल्याचे बेनेट यांनी स्पष्ट केले. पण इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल एकट्यानेही कारवाई करू शकतो, असे सांगून पंतप्रधान बेनेट यांनी लष्करी कारवाईचा इशारा दिला.

याआधीही इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलचे संरक्षणदल ‘चॅरिअट्स ऑफ फायर’ या युद्धसरावाचे आयोजन करून इराणचा अणुप्रकल्प व लष्करी ठिकाणे टिपण्याची तयारी करीत आहे. इस्रायलचा हा युद्धसराव म्हणजे इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो. तर इराणने देखील इस्रायलच्या या युद्धसरावाला उत्तर दिले आहे. इस्रायल फक्त स्वप्नातच इराणवर हल्ला करू शकतो, असे इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

leave a reply