‘आयएनएस सूरत’ व ‘आयएनएस उदयगिरी’चे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते जलावतरण

मुंबई – ‘आयएनएस सूरत’ आणि ‘आयएनएस उदयगिरी’ या युद्धनौकांचे जलावतरण झाले आहे. या युद्धनौकांमुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य अधिकच वाढेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर मुंबईच्या माझगाव डॉक येथे उभारणी झालेल्या या युद्धनौकांमुळे भारताच्या आत्मनिर्भरतेची क्षमता जगासमोर आली आहे. अशाच गतीने आपला प्रवास सुरू राहिला तर भारतीय नौदल केवळ हिंदी महासागर क्षेत्रातच नाही, तर पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरापर्यंत धडक मारील, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे.

‘प्रोजेक्ट 15बी’च्या अंतर्गत उभारणी करण्यात येत असलेल्या 15 विनाशिकांपैकी ‘आयएसएस सूरत’ ही चौथी विनाशिका आहे. मुंबईच्या माझगाव डॉक येथे उभारण्यात आलेली आयएनएस सूरत ही ‘स्टेल्थ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’च्या निर्मितीमधील महत्त्वाचा टप्पा ठरतो. तर ‘आयएनएस उदयगिरी’ ही ‘17 ए’ प्रकल्पाच्या अंतर्गत उभारण्यात येणारी शिवालिक श्रेणीतील विनाशिका आहे. रडारयंत्रणेला गुंगारा देण्याची क्षमता, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, अद्ययावत सेन्सर्स व यंत्रणा यांनी ‘आयएनएस उदयगिरी’ सज्ज आहे.

‘आयएनएस सूरत’ व ‘आयएनएस उदयगिरी’ यांच्यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य अधिकच वाढेल. या दोन्ही युद्धनौकांची निर्मिती देशातच झालेली आहे. तसेच नौदलाच्या ताफ्यात येत असलेल्या 41 पैकी 39 युद्धनौका व पाणबुड्यांची निर्मिती देशातच होत आहे, ही अतिशय समाधानाची बाब ठरते, असे यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. देशाचे सामर्थ्य व आत्मनिर्भरता यामुळे जगासमोर येत असल्याचा दावा संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचे आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या ऐतिहासिक भूमीत ‘आयएनएस सूरत’ व ‘आयएनएस उदयगिरी’ यांचे जलावतरण होत आहे, ही अतिशय अभिमानाची बाब ठरते, असे यावेळी संरक्षणमंत्री म्हणाले. देशाच्या मूळ भूमीपासून दूरवर भारताचे सामर्थ्य प्रदर्शित करण्याचे काम नौदलाकडून केले जाते. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीत नौदल प्रमुख भूमिका बजावत आहे.

विशेषतः जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारत हा महत्त्वाचा हिस्सेदार ठरतो. हे क्षेत्र मुक्त आणि सुरक्षित ठेवणे हा भारतीय नौदलाच्या कर्तव्याचा भाग ठरतो, अशा शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नौदलाचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असताना, या क्षेत्रातील देश अधिकाधिक असुरक्षित बनत चालले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय नौदलाचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले असून चीनला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या भारताशी सहकार्य वाढविण्याला या क्षेत्रात हितसंबंध गुंतलेला प्रत्येक देश प्राधान्य देत आहे. अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया हे क्वाडचे सदस्य देश भारताबरोबरील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करीत असतानाच, फ्रान्स व ब्रिटन हे युरोपिय देश देखील भारतीय नौदलाबरोबरील संपर्क व समन्वय वाढविण्यासाठी अतिशय उत्सुकता दाखवित आहेत.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश म्हणून भारत सर्वात महत्त्वाचा ठरतो, असे फ्रान्सचे म्हणणे आहे. तर ब्रिटन देखील जवळपास याच शब्दात भारताबरोबरील आपल्या सहकार्याला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगत आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाच्या क्षमता व सामर्थ्यात होत असलेली वाढ सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरते. व्यापार व निर्यात वाढत असताना, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यातील वाढ अनिवार्य ठरते, असे विश्लेषक सातत्याने बजावत आहेत. म्हणूनच भारतीय नौदलाच्या ताफ्यात नव्याने येत असलेल्या युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या यांचे स्वागत होत आहे. देशाच्या संरक्षणाबरोबरच सागरी क्षेत्रातील हितसंबंधांच्या रक्षणासाठी नौदलाच्या क्षमतेत अधिकाधिक वाढ करीत राहणे भारतासाठी अत्यावश्यक बनले आहे.

leave a reply