अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे चीनच्या आण्विक पाणबुडीवर तैनात

वॉशिंग्टन – चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही’ने आपल्या आण्विक पाणबुड्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज केल्या आहेत. याद्वारे चीनच्या पाणबुड्या अमेरिकेपर्यंत मारा करू शकतात व ही बाब अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरते. त्याचा दाखला देऊन चीनच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिका करडी नजर रोखून आहे, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तर अमेरिका आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या तैनातीला अवाजवी महत्त्व देऊन या क्षेत्रात तणाव निर्माण करीत असल्याचे चीनचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात इंडोनेशियामध्ये झालेल्या जी२० दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक पार पडली. तीन तासांच्या या बैठकीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी कोरोना, तैवान तसेच इतर मुद्यांवर फारच सौम्य भूमिका घेतल्याची टीका झाली होती. त्यातच बालीमध्ये ही बैठक सुरू असताना चीनने ‘जिन’ श्रेणीतील सहा आण्विक पाणबुड्यांवर ‘जेएल-३’ आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तसंस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली.

याआधी चीनच्या नौदलातील ‘जेएल-२’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ७,२०० किलोमीटर इतकी होती. तर ‘जेएल-३’ आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र १०,००० किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य उद्ध्वस्त करू शकतो, असा दावा चीनच्या यंत्रणांनी केला होता. यापैकी ‘जेएल-२’ची तैनाती केल्याचे चीनने जाहीर केले होते. तर जेएल-३च्या तैनातीला अवकाश असल्याचे चीनने म्हटले होते. अशा परिस्थितीत, आण्विक पाणबुड्यांवर या क्षेपणास्त्रांची तैनाती करून चीनने मोठा निर्णय घेतल्याचा दावा अमेरिकन वृत्तसंस्था करीत आहे.

चीनच्याच संरक्षण मंत्रालयाने २०२१ सालच्या लष्करी अहवालात अमेरिकेला लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांची तैनाती करणार असल्याचे म्हटले होते, याची आठवण अमेरिकन वृत्तसंस्थेने करून दिली. साऊथ चायना सी आणि बोहाईच्या आखातात तैनात चीनच्या पाणबुड्यांमधून प्रक्षेपित होणारी क्षेपणास्त्रे अमेरिकेपर्यंत पोहोचतील, असा इशारा चीनच्या लष्करी अहवालात देण्यात आला होता, याकडे अमेरिकी वृत्तसंस्थेने लक्ष वेधले.

अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’चे प्रमुख ॲडमिरल सॅम पॅपेरो यांनी चीनच्या या नव्या तैनातीवर आक्षेप घेतला. या क्षेपणास्त्रांची निर्मितीच अमेरिकेला धमकावण्यासाठी झाली होती. अमेरिका या पाणबुड्यांवर बारीक नजर ठेवून आहे, असा आरोप ॲडमिरल पॅपेरो यांनी केला. पण चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने अमेरिकेचे आरोप फेटाळले. चीनला अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या देशांपासून संरक्षण करण्यासाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे चिनी मुखपत्राने म्हटले आहे.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या नौदलाच्या हालचाली अतिशय चिंताजनक आहेत. यापासून अमेरिका तसेच या क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने काही दिवसांपूर्वीच दिला होता.

leave a reply