युक्रेनी जनतेसाठी यंदाचा हिवाळा जीवघेणा ठरेल

किव्ह – ‘युक्रेनमधील अर्ध्याहून अधिक वीजपुरवठा यंत्रणा उद्ध्वस्त झालेली आहे. याचे जबरदस्त परिणाम युक्रेनमधील आरोग्यव्यवस्थेवरही दिसून येत आहेत. युक्रेनी जनतेच्या आरोग्यालाही मोठे धोके दिसत आहे. यंदाचा हिवाळा युक्रेनी नागरिकांसाठी जीवनमृत्यूची लढाई असेल’, असा गंभीर इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने(डब्ल्यूएचओ) दिला आहे. सुरक्षितता व ऊर्जेसाठी युक्रेनमधील किमान २० ते ३० लाख नागरिकांना हिवाळ्यात स्थलांतर करणे भाग पडेल, असेही ‘डब्ल्यूएचओ’चे वरिष्ठ अधिकारी हॅन्स क्लुग यांनी बजावले.

गेल्या महिन्यापासून रशियाने युक्रेनमधील शहरांवर नियमित क्षेपणास्त्र तसेच ड्रोनहल्ल्यांचे सत्र सुरू केले होते. या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील लष्करी जागांबरोबरच वीजपुरवठा यंत्रणा तसेच पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक शहरांमधील तब्बल एक कोटी नागरिकांचा वीज तसेच पाणीपुरवठा खंडित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच, देशातील वीज वाचविण्यासाठी युक्रेनी नागरिकांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारावा, असा सल्ला ‘डीटीईके’ या युक्रेनमधील आघाडीच्या वीजकंपनीने दिला होता. त्याचवेळी, युक्रेनला सहाय्य करणाऱ्या देशांनी ब्लँकेट्सचा तातडीने पुरवठा करावा, अशी विनंतीही युक्रेन सरकारकडून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात युक्रेनच्या विविध भागांमधील तापमान शून्य अंशाच्या जवळपास पोहोचले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ साचण्यासही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत वीज तसेच ‘हिटिंग यंत्रणा’ उपलब्ध नसणे युक्रेनी जनतेसमोरील आव्हाने अधिक वाढविणारे ठरले आहे. त्यामुळे आता युक्रेन सरकारकडून शहरांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. खेर्सन तसेच मायकोलेव्ह शहरांमधील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली आहे. युक्रेनच्या विविध शहरांमधील ‘ब्लॅकआऊट्स’ मार्च महिन्यापर्यंत कायम राहतील, असे संकेतही देण्यात आले आहेत.

युक्रेनपाठोपाठ युरोपिय देशांनाही कडक हिवाळ्याला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रशियाकडून होणारा नियमित इंधनपुरवठा बंद असल्यामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये विजेच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. काही शहरांमध्ये लोडशेडिंग सुरू असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. काही युरोपिय देशांनी जुने बंद पडलेले ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. तर नागरिकांनी थेट जंगलातून लाकूड आणून घरे उबदार ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

leave a reply