युक्रेनी प्रांतांच्या अधिग्रहणावरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे रशियावर टीकास्त्र

- संयुक्त राष्ट्रसंघटनेसह अमेरिका व युरोपिय महासंघाकडून तीव्र प्रतिक्रिया

वॉशिंग्टन – रशियाने युक्रेनमधील चार प्रांतांच्या केलेल्या अधिग्रहणाला कोणताही कायदेशीर आधार नसून संयुक्त राष्ट्रसंघटना त्याला मान्यता देत नाही, अशी टीका महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी केली. कोणत्याही देशाने इतर देशातील भागावर जबरदस्तीने मिळविलेला ताबा ‘युएन चार्टर’मधील तत्त्वांचे उल्लंघन ठरते, असा ठपकाही गुटेरस यांनी ठेवला. संयुक्त राष्ट्रसंघटनेबरोबरच अमेरिका व युरोपिय महासंघानेही रशियाने केलेल्या अधिग्रहणाच्या घोषणेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या सार्वमतानंतर बुधवारी रशियाचे नियंत्रण असलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांनी रशियात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यात डोन्बास क्षेत्राचा भाग असलेल्या लुहान्स्क व डोनेत्स्कसह खेर्सन तसेच झॅपोरिझिआचा समावेश आहे. बुधवारी जाहीर केलेल्या निकालांनुसार 85 टक्क्यांहून अधिक मतदारांनी रशियात सहभागी होण्याच्या बाजूने कौल दिल्याचे रशियन यंत्रणांनी घोषित केले होते. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, या चारही प्रांतातील जनतेची सुरक्षा ही रशियाची जबाबदारी असून पुढील काळात त्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील दिली होती.

त्यानंतर, शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी चारही प्रांत अधिकृतरित्या रशियाचा भाग बनल्याची घोषणा केली. त्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘रशियाने घेतलेल्या लुहान्स्क, डोनेत्स्कसह खेर्सन व झॅपोरिझिआच्या ताब्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. यासंदर्भातील निर्णयाचा निषेध करायलाच हवा. हे युएन चार्टरच्या तत्वांचे उल्लंघन ठरते. रशिया हा सुरक्षा परिषदेचा स्थायी सभासद आहे. त्यामुळे युएन चार्टरचा आदर करण्याची विशेष जबाबदारी त्यांच्यावर आहे. युक्रेनच्या प्रांतांचे अधिग्रहण ही अत्यंत धोकादायक अशी चिथावणी ठरते’, अशी टीका संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव गुटेरस यांनी केली.

युक्रेनचा भाग आपल्याला जोडून घेण्याच्या रशियाच्या प्रयत्नांना अमेरिका कधीही मान्यता देणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बजावले. युरोपिय महासंघानेही अमेरिकेच्या वक्तव्यांचीच री ओढली आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्याच्या अधिकारांचे रशियाने उघड उल्लंघन केले आहे. अशा बेकायदेशीर कृत्याला आम्ही कधीच मान्यता देणार नाही. महासंघाच्या युक्रेनसंदर्भातील धोरणांमध्ये फरक पडणार नाही, असे महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी म्हटले आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनीही युक्रेनी प्रांतांच्या अधिग्रहणावर नाराजी दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

रशियाच्या घोषणेनंतर युक्रेनने नाटोच्या सदस्यत्वाची प्रक्रिया ‘फास्ट ट्रॅक’ करावी, अशी मागणी पुढे केली आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ही मागणी केल्याचे सांगण्यात येते.

leave a reply