युरोपातील इंधनवायूचे दर दोन हजार डॉलर्सवर

- इंधनदरांवरील मर्यादेवरून युरोपिय देशांमधील मतभेद ऐरणीवर

ब्रुसेल्स/मॉस्को – रशियातून युरोपला पुरविण्यात येणाऱ्या इंधनवाहिनीच्या मुद्यावर नव्या निर्बंधांची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, युरोपातील इंधनवायूचे दर 10 टक्क्यांनी उसळून प्रति हजार घनमीटरमागे दोन हजार डॉलर्सवर पोहोचले आहेत. गेल्या चार दिवसात इंधनवायूच्या दरांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर युरोपिय महासंघात झालेल्या एका बैठकीत रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा घालण्याच्या प्रस्तावावर पुन्हा मतभेद झाल्याचे उघड झाले. जर्मनी, ऑस्ट्रिया यासारख्या देशांनी याला विरोध दर्शविल्याचे सांगण्यात येते.

रशियातून युरोपला पुरविण्यात येणाऱ्या इंधनवायूचा मुख्य भाग असलेली ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनी सध्या बंद आहे. मात्र युक्रेनमार्गे जाणाऱ्या ‘तुर्क स्ट्रीम’ या इंधनवाहिनीतून तुर्कीसह युरोपिय देशांना इंधनवायूचा पुरवठा सुरू आहे. मंगळवारी रशियाच्या गाझप्रोम या कंपनीने युक्रेनी कंपनीबरोबर आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाल्याचे सांगून त्यामुळे इंधनपुरवठ्यात समस्या निर्माण होऊ शकते, असे बजावले होते.

त्यानंतर आता तुर्क स्ट्रीमच्या पुरवठ्यात बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करता येणार नसल्याची बाब समोर आली आहे. युरोपिय महासंघाने रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे त्यात अडचणी येऊ शकतात, असे सांगण्यात येते.

ही बाब समोर आल्यानंतर युरोपमधील इंधनवायूचे दर पुन्हा एकदा उसळले आहेत. शुक्रवारी इंधनवायूच्या दरांमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे इंधनवायूचा दर प्रति हजार घनमीटरमागे 2,100 डॉलर्सवर पोहोचला. ही या आठवड्यातील तिसरी मोठी उसळी ठरते. सोमवारी ‘नॉर्ड स्ट्रीम’मधील गळतीची घटना समोर आल्यानंतर युरोपातील इंधनवायूचे दर वाढले होते. त्यानंतर गाझप्रोमने दिलेला इशारा व आता ‘तुर्क स्ट्रीम’ची घटना यामुळे इंधनवायूच्या दरांनी उसळी घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान, रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा घालण्याचा युरोपचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. या मुद्यावर महासंघात एकमत झालेले नसल्याची कबुली महासंघाच्या वरिष्ठ अधिकारी कॅड्रि सिम्सन यांनी दिली. इटली व पोलंड यासारख्या देशांनी या मुद्यावर आग्रही भूमिका घेतली असून जर्मनीसारख्या प्रमुख देशाने विरोध दर्शविला आहे.

leave a reply