आंतरराष्ट्रीय समुदाय अमेरिकी डॉलरपासून हळूहळू दूर चालला आहे

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा दावा

वॉशिंग्टन – जागतिक समुदाय हळूहळू अमेरिकी डॉलरपासून दूर जाताना दिसत आहे, असा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी केला. पुढील जग मध्यवर्ती बँकांकडून विकसित होत असलेल्या ‘डिजिटल करन्सीं’च्या दिशेने झुकलेले पहायला मिळेल, असे संकेतही जॉर्जिवा यांनी दिले. गेल्या काही महिन्यांमध्ये जागतिक राखीव चलन म्हणून अमेरिकी डॉलरचे स्थान कमकुवत होत असल्याचे इशारे वारंवार देण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन तसेच आघाडीचे गुंतवणुकदार व विश्लेषक रुचिर शर्मा यांनीही याकडे लक्ष वेधले होते.

आंतरराष्ट्रीय समुदाय अमेरिकी डॉलरपासून हळूहळू दूर चालला आहे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा दावाअमेरिकी डॉलरला पर्याय असणारे राखीव चलन या मुद्यावर गेली काही दशके चर्चा सुरू असली तरी नजिकच्या काळात त्याला अधिक वेग आला आहे. अमेरिकेने आर्थिक व व्यापारी युद्धात डॉलरचा हत्यारासारखा केलेला वापर आणि अमेरिकी प्रशासनाकडून डॉलरसंदर्भात घेण्यात आलेले चुकीचे निर्णय यामुळे अनेक देश हळूहळू डॉलरपासून दूर जात असल्याचे दिसत आहे. इराण व रशियन अर्थव्यवस्थेवर अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि त्याचे झालेले परिणाम यामुळे जगातील इतर आघाडीच्या देशांनीही डॉलरच्या बाबतीत आपत्कालीन योजनांची तयारी सुरू केली आहे.

नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिवा यांनी केलेले वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरते. कॅलिफोर्नियातील ‘मिल्कन इन्स्टिट्यूट’मध्ये झालेल्या कार्यक्रमात जॉर्जिवा यांनी अमेरिकी डॉलरला पर्याय शोधण्यासाठी हालचाली सुरू असल्याची कबुली दिली. मात्र त्याचवेळी सध्या अमेरिकी डॉलरला कोणताच पर्याय दिसत नसून नजिकच्या काळातही तयार होईल, असे वाटत नसल्याचा दावाही नाणेनिधीच्या प्रमुखांनी केला.

आंतरराष्ट्रीय समुदाय अमेरिकी डॉलरपासून हळूहळू दूर चालला आहे - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांचा दावाअमेरिकी अर्थव्यवस्थेची व्याप्ती व मजबुती, अमेरिकी भांडवल बाजार व्यवस्था आणि डॉलरबद्दल विश्वास निर्माण करण्याची क्षमता या जोरावर अमेरिकी डॉलरने राखीव चलन म्हणून आपले स्थान कायम राखले आहे, याची जाणीव नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिवा यांनी करून दिली. डॉलरला पर्याय शोधण्याच्या तयारीबाबत बोलताना त्यांनी डिजिटल करन्सीच्या मुद्याकडेही लक्ष वेधले. जगातील विविध मध्यवर्ती बँकांकडून विकसित करण्यात येणाऱ्या डिजिटल करन्सींचा वापर डॉलरला पर्याय म्हणून करण्याबाबत विचार होऊ शकतो, असा दावा जॉर्जिवा यांनी केला.

अमेरिकी डॉलरला सध्या सर्वात मोठी स्पर्धा युरो चलनाकडून आहे. युरोने काही प्रमाणात अमेरिकी डॉलरची जागा मिळविल्याचे नाणेनिधीच्या प्रमुखांनी सांगितले. पौंड, येन व युआन यांची भूमिका छोटी आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले. चीनकडून आपल्या युआन चलनाला राखीव चलन म्हणून स्थान मिळवून देण्याची धडपड सुरू आहे. गेल्या काही वर्षात चीनने इतर देशांबरोबरील द्विपक्षीय व्यापारात मोठ्या प्रमाणात युआनचा वापर सुरू केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच आखातातील एक मोठा इंधनव्यवहारही युआनमध्ये पार पडला होता. त्याचवेळी ‘ब्रिक्स’ या गटाकडून स्वतंत्र चलनासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

हिंदी

 

leave a reply