कोरोनाच्या आव्हानाविरोधात जागतिक एकजूट व्हावी

- भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहन

माटेरा – सार्‍या जगाला ग्रासणार्‍या कोरोनाच्या साथीचा जागतिक एकजुटीने सामना करणे भाग आहे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले त्याचवेळी कोरोनाच्या साथीनंतर उत्पादनासाठी जगाला एकाच देशावर अवलंबून राहता येणार नाही, उत्पादनाचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले. जगाची फॅक्टरी अशी ओळख असलेल्या चीनवर यापुढे उत्पादनासाठी अवलंबून राहता येणार नाही, असा संदेश जयशंकर यांनी राजनैतिक भाषेत दिला आहे.

कोरोनाच्या आव्हानाविरोधात जागतिक एकजूट व्हावी - भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे आवाहनइटलीमध्ये सुरू होत असलेल्या जी20 परिषदेसाठी जयशंकर या देशात दाखल झाले. यावेळी त्यांनी ब्रिटन, जपान, कॅनडा, सौदी अरेबिया, मेक्सिको आणि इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉम्निक राब यांच्याबरोबर द्विपक्षीय सहकार्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जागतिक पातळीवरील सहकार्य आणि एकजूट आवश्यक असल्याची जाणीव भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली.

कोरोनाच्या जागतिक आव्हानाला जागतिक पातळीवरील एकजूट हेच उत्तर असू शकते. उत्पादनापासून ते कोरोनाप्रतिबंधक लसींच्या निर्मितीपर्यंत सर्वच आघाड्यांवर ही एकजूट महत्त्वाची ठरते, असे जयशंकर म्हणाले. याबरोबरच कोरोनाच्या साथीमुळे जागतिक पातळीवरील उत्पादन क्षेत्राचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे सांगून भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कोरोनाच्या साथीने दिलेला हा धडा असल्याचा दावा केला. या आघाडीवरील वैविध्य ही आत्ताची फार मोठी आवश्यकता बनली आहे आणि त्याचे प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये पडायला हवे, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जी7 परिषदेत कोरोनाची साथ चीननेच पसरविली, या आरोपांना दुजोरा मिळाला होता. या परिषदेत सदस्यदेशांनी चीनला धारेवर धरले होते. जी20मध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. कोरोनाच्या साथीमुळे झालेल्या अपरिमित हानीला चीन जबाबदार आहे, हा आरोप अधिकाधिक तीव्र बनत चालला असून ‘वुहान लॅब लीक थिअरी’ नाकारणे आता चीनसह चीनच्या आंतरराष्ट्रीय समर्थकांसाठीही अवघड बनले आहे. म्हणूनच या जी20 परिषदेला फार मोठे राजकीय व धोरणात्मक महत्त्व असल्याचे दिसते.

leave a reply