क्युबा अस्थिर करण्यामागे आंतरराष्ट्रीय कट

- राष्ट्राध्यक्ष मिगेल डिआज-कॅनल यांचा आरोप

आंतरराष्ट्रीय कटहवाना/वॉशिंग्टन – क्युबा अस्थिर व धोकादायक बनला आहे, अशा प्रकारचे चित्र उभे करण्यामागे आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगेल डिआज-कॅनल यांनी केला. क्युबातील निदर्शने व इतर खोट्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात येत असून हा अपारंपारिक युद्धाचा भाग असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. गेल्या आठवड्यात क्युबात सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीच्या कारभाराविरोधात व्यापक निदर्शने करण्यात आली. सत्ताधारी राजवटीविरोधात झालेली ही सर्वात मोठी निदर्शने असल्याचे सांगण्यात येते.

क्युबातील कम्युनिस्ट राजवटीने देशातील निदर्शनांविरोधात कारवाई केली असून सुमारे 400हून अधिक जणांना ताब्यात घेतल्याचे मानले जाते. सुरक्षायंत्रणांनी केलेल्या कारवाईत एका निदर्शकाचा बळी गेल्याचेही सांगण्यात येते. देशातील विविध शहरांमध्ये झालेल्या निदर्शनांनंतर राष्ट्राध्यक्ष मिगेल डिआज-कॅनल यांनी, यामागे काही प्रमाणात सरकारचे निर्णय कारणीभूत असल्याची कबुली दिली होती. मात्र त्यानंतर सरकारने आक्रमक पवित्रा घेत देशातील इंटरनेटवर निर्बंध लादले असून अमेरिकेवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय कटशनिवारी सत्ताधारी राजवटीने सरकारच्या समर्थनार्थ व्यापक मोर्च्यांचे आयोजन केले होते. राजधानी हवानात झालेल्या मोर्च्यात राष्ट्राध्यक्ष कॅनल व फिडेल कॅस्ट्रो यांचे भाऊ रौल कॅस्ट्रो सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्राध्यक्षांनी क्युबातील निदर्शने आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप केला. ‘क्युबात झालेल्या निदर्शनांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटली व अनेक परदेशी नेत्यांनी टीका केली. ही गोष्ट घडवून आणलेली होती. क्युबात राजवटीविरोधात व्यापक उठाव होत आहे, असे चुकीचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न झाला’, असा ठपका राष्ट्राध्यक्ष मिगेल डिआज-कॅनल यांनी ठेवला.

क्युबाला सायबरयुद्धाचे लक्ष्य करण्यात आले असून, ‘सायबर टेररिझम’ व ‘मीडिया टेररिझम’चाही वापर करण्यात येत असल्याचा आरोप क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. काही दिवसांपूर्वी रशियाने क्युबातील निदर्शनांसाठी अमेरिकेला लक्ष्य करताना, अमेरिका क्युबात ‘कलर रिव्होल्युशन’ घडिविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला होता. त्याचवेळी क्युबात परकीय शक्तींचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रशियाने दिला होता.

दुसर्‍या बाजूला अमेरिकेत क्युबन जनतेच्या समर्थनार्थ व्यापक निदर्शने सुरू झाली आहेत. व्हाईट हाऊसजवळ तसेच मियामी शहरात क्युबन निदर्शकांच्या समर्थनार्थ ‘फ्रीडम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी क्युबात हस्तक्षेप करावा, असे फलकही झळकाविण्यात आले. सोमवारी क्युबन-अमेरिकी नागरिकांच गटाकडून बोट रॅलीचेही आयोजन करण्यात आले असून शेकडो बोटी क्युबानजिकच्या सागरी क्षेत्रात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

1959 साली क्युबात झालेल्या क्रांतीनंतर फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वाखाली कम्युनिस्ट राजवट सत्तेवर आली होती. अमेरिकेने अनेकदा कॅस्ट्रो यांची राजवट उलथण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ते अपयशी ठरले. अमेरिकेने क्युबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले होते. 2015 साली तत्कालिन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्युबावरील निर्बंध काही प्रमाणात मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत क्युबाचा समावेश दहशतवादसमर्थक देशांच्या यादीत करून क्युबावर नव्याने निर्बंध लादण्यात आले होते.

leave a reply