सोशल मीडिया आणि क्रिप्टोकरन्सीसाठी आंतरराष्ट्रीय मापदंड हवे

- ‘समिट फॉर डेमोक्रसी’मध्ये पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली – ‘लोकशाही ही केवळ लोकांसाठी, लोकांची नसून लोकांसोबत आणि लोकांमध्येही असते’, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेने आयोजित केलेल्या ‘समिट फॉर डेमोक्रसी’मध्ये भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याची ओळख करून दिली. त्याचबरोबर लोकशाही सक्षम करायची असेल तर सोशल मीडिया आणि क्रिप्टोकरन्सी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जागतिक मापदंड लावण्याची आवश्यकता असल्याचे भारताच्या पंतप्रधानांनी ठासून सांगितले. गेल्या तीन आठवड्यांमध्ये दुसर्‍यांदा पंतप्रधानांनी क्रिप्टोकरन्सीबाबत लोकशाहीवादी देशांना सावध केले आहे.

सोशल मीडिया आणि क्रिप्टोकरन्सीसाठी आंतरराष्ट्रीय मापदंड हवे - ‘समिट फॉर डेमोक्रसी’मध्ये पंतप्रधानांचे आवाहनअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जगभरातील लोकशाही देशांची ‘समिट फॉर डेमोक्रसी’ परिषद आयोजित केली आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला शंभरहून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी या परिषदेच्या माध्यमातून जगभरातील लोकशाहीवादी देशांना संबोधित केले. लोकशाहीचे मूळ बलस्थान म्हणजे आपली जनता आणि नैतिकता हे असते, असे पंतप्रधान म्हणाले.

लोकशाहीची भावना आणि आचारसंहिता यांनी प्राचीन भारताला सर्वात समृद्ध बनवले. वसाहतवाद्यांनी काही शतके भारतावर राज्य करूनही ते भारतीयांमधील लोकशाहीची भावना दडपू शकले नाहीत. ही भारताच्या लोकशाहीची खरी ताकद असल्याचे पंतप्रधानांनी ठणकावले. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या मदतीने मुक्त आणि खुल्या वातावरणात निवडणूक घेण्यासंदर्भातील कौशल्य इतर देशांना पुरविण्यासाठी भारत तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

यानंतर पंतप्रधानांनी सोशल मीडिया आणि क्रिप्टोकरन्सी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जागतिक मापदंड निश्‍चित करण्याची आवश्यकता असल्याचे बजावले. लोकशाहीला हादरे देण्यापेक्षा लोकशाही मजबूत करण्यासाठी यांचा वापर झाला तर ते योग्य ठरेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या महिन्यात सिडनी डायलॉग येथेही पंतप्रधानांनी क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात जाता कामा नये, हे लोकशाहीवादी देशांनी सुनिश्‍चित करण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले होते. आपल्या युवावर्गाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे आवाहन त्यावेळी पंतप्रधानांनी केले होते.

leave a reply