पूर्व युक्रेनमध्ये रशियन्सचा वंशसंहार सुरू आहे

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – पूर्व युक्रेनच्या डोन्बास भागात सुरू असलेला संघर्ष म्हणजे त्या क्षेत्रातील रशियन्सचा वंशसंहार असल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. यावेळी त्यांनी ‘रुसोफोबिया’ या शब्दाचा वापर करून हे वंशसंहाराच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले असून हा रशियन अपप्रचाराचा भाग असल्याची टीका केली. पूर्व युक्रेनच्या डोन्बास भागात रशियासमर्थक बंडखोर गट व युक्रेनच्या लष्करात संघर्ष सुरू आहे. सध्या या संघर्षाची तीव्रता कमी असली तरी अधूनमधून चकमकी उडत असल्याचे समोर येत आहे. या चकमकी सुरू असतानाच युक्रेनमध्ये वास्तव्य करणार्‍या रशियन नागरिक व उद्योजकांवर कारवाई करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. युक्रेनमधील काही गट रशियाविरोधात असलेल्या असंतोषाच्या भावनेला प्रोत्साहन देत असल्याचेही उघड झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलेल्या दाव्याला याची पार्श्‍वभूमी असल्याचे सांगण्यात येते.

पूर्व युक्रेनमध्ये रशियन्सचा वंशसंहार सुरू आहे - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनदरम्यान, पूर्व युक्रेनमध्ये संघर्षबंदीचे प्रयत्न पुन्हा अपयशी ठरले आहेत. युक्रेनने संघर्षबंदीसाठी अवाजवी प्रस्ताव दिल्याचा आरोप रशियाने केला आहे. तर रशियाने आपल्या दिलेले प्रस्ताव नाकारल्याने संघर्षबंदी झाली नसल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. संघर्षबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी उभारलेल्या गटात फ्रान्स व जर्मनीचा समावेश करण्याची मागणी युक्रेनने केली होती. मात्र रशियाने त्याला नकार दिला आहे.

पूर्व युक्रेनमध्ये रशियन्सचा वंशसंहार सुरू आहे - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनरशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रायबकोव्ह यांनी पूर्व युक्रेनमधील परिस्थितीची तुलना १९६२ सालच्या ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’शी केली आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना उपपरराष्ट्रमंत्री रायबकोव्ह यांनी, घटना अशाच रितीने घडत राहिल्या तर पूर्व युक्रेनमधील परिस्थिती ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’प्रमाणेच होऊ शकते, असा दावा केला. १९६२ साली क्युबातील क्षेपणास्त्रांच्या तैनातीचा मुद्दा चिघळल्याने अमेरिका व रशियात अणुयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती.

leave a reply