इराण थेट इस्रायलवर हल्ला चढवू शकतो

- हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाचा इशारा

बैरूत/तेहरान – ‘आखाती क्षेत्रातील इराणच्या उपस्थितीविरोधात इस्रायलने आक्रमकता दाखवायचा प्रयत्न केलाच तर इराण थेट इस्रायलवर हल्ला चढवू शकतो’, असा इशारा हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाने दिला. तर, ‘काही अरब देशांनी सहकार्य प्रस्थापित केल्यामुळे इस्रायल पॅलेस्टिनींवर करीत असलेल्या कारवायांवर कुठलाही फरक पडलेला नाही. याउलट संघर्षानेच इस्रायलला उत्तर देता येईल’, अशी चिथावणी हिजबुल्लाहच्या प्रमुखाने दिली.

थेट इस्रायलवर हल्लाइराण तसेच लेबेनॉनमध्ये शुक्रवारी इस्रायलविरोधात निदर्शने झाली. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या इराणसमर्थक दहशतवादी संघटनेने इस्रायलविरोधी निदर्शनांचे आयोजन केले होते. या निदर्शकांना संबोधित करताना हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने इस्रायलला इशारा दिला. इस्रायलने आखाती देशांमधील इराणच्या तैनातीवर हल्ले चढवू नये. असे केल्यास इराण थेट इस्रायलवर हल्ले चढविल, असे नसरल्लाने धमकावले.

गेल्या महिन्याभरातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हिजबुल्लाहच्या प्रमुखाने इस्रायलला धमकावल्याचा दावा केला जातो. दोन दिवसांपूर्वीच इस्रायलने सिरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ले चढविले. यामध्ये चार सिरियन जवान मारले गेले होते. याआधीही इस्रायलने सिरियात हल्ले करून इराणचे जवान आणि इराणसंलग्न गटांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर, नसरल्लाने इस्रायलला धमकावल्याचा दावा केला जातो.

मार्च महिन्याच्या अखेरीस इराणने इराकच्या कुर्दिस्तान प्रांतात क्षेपणास्त्र हल्ले केले होते. कुर्दिस्तानची राजधानी इरबिल येथील इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या तळाला लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला होता. मोसाद या तळाचा वापर करून इराण तसेच आखातातील इराणच्या हितसंबंधांविरोधात कारवाई करीत असल्याचा आरोप इराणने केला होता. इस्रायलने इराणच्या हितसंबंधाना पुन्हा लक्ष्य केले तर इरबिलप्रमाणे उत्तर मिळेल, असा संदेश नसरल्लाने दिल्याचे इराणी माध्यमांचे म्हणणे आहे.

थेट इस्रायलवर हल्लाइस्रायलला धमकावल्यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखाने इस्रायलशी सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या अरब देशांना इशारा दिला. ‘अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करणे, हा इस्रायलच्या मोठ्या योजनेचा भाग होता. हे सहकार्य प्रस्थापित केल्यामुळे इस्रायल पॅलेस्टिनी आणि इतर अरबांवर करीत असलेल्या कारवायांमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही’, असा ठपका नसरल्लाने ठेवला.

तसेच सहकार्य प्रस्थापित करून काहीही साध्य होणार नाही. पण इस्रायलविरोधात एकजूटीने संघर्ष केला तर बरेच काही मिळविता येईल, असा दावा नसरल्लाने केला. गेल्या महिन्याभरात इस्रायलच्या तेल अविव, बिरशेबा, बेनी ब्राक आणि हादेरा या शहरांमध्ये एकांड्या दहशतवाद्यांनी इस्रायली सुरक्षारक्षक आणि नागरिकांवर चढविलेल्या हल्ल्यांचे नसरल्लाने स्वागत केले. तसेच पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी इस्रायलवर अशाप्रकारचे हल्ले सुरू ठेवावे, अशी चिथावणी हिजबुल्लाहच्या प्रमुखाने दिली.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी देखील तेहरानमध्ये आयोजित कार्यक्रमात इस्रायलमधील हल्ल्यांचे स्वागत केले. तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रमुख मोहम्मद हुसेन सालेमी आणि कुद्स फोर्सेसचे प्रमुख इब्राहिम घनी यांनी इस्रायलविरोधात संघर्ष करणाऱ्या कुठल्याही गटाला इराणचे समर्थन असेल, या दोन्ही लष्करी नेत्यांनी जाहीर केले.

दरम्यान, गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेच्या काही कमांडर्सनी दोन दिवसांपूर्वी इराणचा दौरा केला होता. इराणचे नेते आणि हिजबुल्लाहचा प्रमुख इस्रायलला धमकावत असताना, हमासच्या कमांडर्सचा हा इराण दौरा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply