इराण पाठोपाठ सौदीही अणुबॉम्बने सज्ज होईल

- अमेरिकन लष्करी विश्लेषकांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘बायडेन प्रशासनाने केलेल्या अणुकरारानंतरही इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर सौदी अरेबिया शांत बसणार नाही. अगदी दुसऱ्याच दिवशी सौदी देखील अणुबॉम्ब संपादन करू शकतो’, असा इशारा अमेरिकेतील लष्करी विश्लेषकांनी दिला. सौदी पाकिस्तानकडून अणुबॉम्बची खरेदी करून इराणला आव्हान देऊ शकतो, असा दावा या विश्लेषकांनी केला. इराण अवघ्या काही आठवड्यांमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानंतर अमेरिकेतील लष्करी विश्लेषकांनी बायडेन प्रशासनाला बजावल्याचे दिसत आहे.

अणुबॉम्बने सज्जगेल्या सहा महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात अणुकराराबाबत व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. व्हाईट हाऊसने इराणबरोबरचा अणुकरार मोडीत निघणार असल्याचे संकेत दिले आहेत. सद्यपरिस्थितीत अणुकरार अपयशी ठरला तर अवघ्या काही आठवड्यांमध्ये किंवा त्याहून कमी कालावधीत इराण अणुबॉम्बची निर्मिती करू शकतो, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

त्याचवेळी बायडेन प्रशासनातील एक गट अजूनही अणुकरारावर ठाम असल्याचे अमेरिकेतील विश्लेषक लक्षात आणून देत आहेत. व्हिएन्ना येथील अणुकराराबाबतच्या वाटाघाटी अजूनही संपलेल्या नाहीत. बायडेन प्रशासन या अणुकरारासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा अमेरिकन विश्लेषक करीत आहेत. मात्र येत्या काळात अणुकरार संपन्न झाला तरी हा करार इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखणारा नसेल; कारण या अणुकराराने इराणचा अणुकरार फक्त लांबला जाईल, असे इशारे अमेरिकेतील लष्करी विश्लेषकांकडून दिले जात आहेत.

अणुबॉम्बने सज्जअशा परिस्थितीत, इराण अणुबॉम्बने सज्ज झालाच तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सौदी अरेबिया पाकिस्तानकडून अणुबॉम्बची खरेदी करील, असा इशारा ‘दी हेरिटेज फाऊंडेशन’, या अमेरिकी अभ्यासगटातील आखाती विभागाचे विश्लेषक जिम फिलिप्स यांनी दिला. सुरुवातीच्या काळात सौदीने पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला आर्थिक सहाय्य पुरविले होते. त्याची भरपाई म्हणून सौदी पाकिस्तानकडून अणुबॉम्ब मिळवू शकतो, असा दावा फिलिप्स यांनी केला.

आत्तापर्यंत सौदीने इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत राजनैतिक वाटाघाटींच्या भूमिकेचे समर्थन केले होते. पण 2015 सालचा अणुकरार इराणलचा अणुकार्यक्रम रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर सौदी आणखी एका अणुकरारावर विश्वास ठेवू शकणार नाही, याकडे फिलिप्स लक्ष वेधत आहेत. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी सौदीने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या फोनला उत्तर देण्याचे टाळले होते, याची आठवण अमेरिकन विश्लेषकांनी करून दिली. यावरुन इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत सौदीची बायडेन प्रशासनावरील नाराजी स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दावा फिलिप्स यांनी केला.

दरम्यान, पाकिस्तानातील पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचे हंगामी सरकार सौदीसमर्थक आहे. पाकिस्तानची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान शरीफ यांनी पहिल्यांदा सौदीचा दौरा केला, याकडे आखातातील विश्लेषक लक्ष वेधत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे सौदीबरोबरचे संबंध बिघडले होते. पंतप्रधान इम्रान तसेच पाकिस्तानी माध्यमांनी सौदीविरोधात भूमिका स्वीकारली होती. तर याच काळात इम्रान खान यांच्या सरकारने इराणशी जवळीक साधली होती. अशा परिस्थितीत, पाकिस्तानात शरीफ यांचे सरकार सौदीसाठी सहाय्यक ठरेल, असे आखातातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply