सिरियातील भूकंपग्रस्तांना सहाय्याच्या आडून इराण शस्त्रतस्करी करू शकतो

आंतरराष्ट्रीय विश्लेषकाचा इशारा

iran syria quake aid largeतेल अविव – ‘मानवतावादी सहाय्याच्या आडून लेबेनॉनमध्ये कुद्स फोर्सेसचे जवान, गुप्तचर यंत्रणेचे एजंट्स आणि शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याचा इराणचा इतिहास आहे. त्यामुळे सिरियातील भूकंपग्रस्तांना सहाय्य करण्याच्या आडून इराण पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांची तस्करी करू शकतो व आंतरराष्ट्रीय समुदायाने याबाबत सावध रहावे’, असा इशारा जेसन ब्रॉड्स्की यांनी दिला.

तीन दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये केंद्र असलेल्या प्रलयंकारी भूकंपाने सिरियालाही हादरवून सोडले आहे. गेली काही वर्षे गृहयुद्धात होरपळणाऱ्या सिरियाच्या संकटात या भूकंपाने भर टाकली आहे. तुर्कीप्रमाणे सिरियासाठीही आंतरराष्ट्रीय स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. इराणचे मालवाहू विमान देखील सिरियातील भूकंपपीडितांसाठी सहाय्य घेऊन सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये उतरले आहे.

पण ‘युनायटेड अगेन्स्ट ए न्युक्लिअर इरान’ या संघटनेचे संचालक जेसन ब्रॉड्स्की यांनी इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना इराणच्या या सहाय्यावर बाaरीक नजर ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. १९९०च्या दशकात बोस्नियात सुरू असलेल्या संघर्षात इराणने अशाप्रकारे तस्करी केल्याची कबुली रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यानेच दिली होती, याकडे ब्रॉड्स्की यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर तुर्की व सिरियाला सहाय्य पाठविणाऱ्या इराणच्या राजवटीवर स्थानिक इराणी जनताच नाराज असल्याचेही ब्रॉड्स्की म्हणाले.

leave a reply