गाझातील एका रॉकेट हल्ल्याला इस्रायल ५० क्षेपणास्त्रांनी उत्तर देईल

इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांचा इशारा

gaza-rocketsजेरूसलेम – सलग दोन आठवडे गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेला इस्रायलने सज्जड इशारा दिला. यापुढे गाझापट्टीतून इस्रायलवर एक जरी रॉकेट डागले तर प्रत्युत्तरादाखल इस्रायल ५० क्षेपणास्त्रांचा मारा करील, असे इस्रायलचे अंतर्गत सुरक्षामंत्री इतमार बेन-ग्वीर यांनी बजावले. बेन-ग्वीर यांनी इशारा दिल्याप्रमाणे इस्रायली लष्कराने कारवाई केली तर गाझावर क्षेपणास्त्रांचा वर्षाव होऊ शकतो. कारण गाझामधील दहशतवाद्यांकडून इस्रायलवर सातत्याने रॉकेट्सचा मारा केला जातो.

israel weaponsगेल्या सलग दोन वर्षात गाझापट्टीतून इस्रायलवर भीषण रॉकेट्सचे हल्ले केले गेले. २०२१ साली ६ ते २१ मे या पंधरा दिवसांच्या कालावधीत हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर तब्बल ४३६० रॉकेट्सचे हल्ले चढविले होते. इस्रायलच्या हवाईदलानेही प्रत्युत्तर देताना गाझातील हमासच्या ठिकाणांवर जवळपास १५०० हल्ले चढविले. या संघर्षात २५६ पॅलेस्टिनी तर १३ इस्रायलींचा बळी गेला होता. हमासचे बहुतांश रॉकेट्स गाझाच्या सीमेतच कोसळल्यामुळेही पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचे समोर आले होते.

ben gvirतर त्यानंतर २०२२ साली गाझातील इस्लामिक जिहादने इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती केली. यावेळी ५ ते ७ ऑगस्ट अशा तीन दिवसांसाठी गाझातील रॉकेट्सचे हल्ले मर्यादित होते. पण या तीन दिवसांमध्येही इस्लामिक जिहादने सुमारे ११०० रॉकेट्स इस्रायलवर प्रक्षेपित केले होते. तर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी १४७ हवाई हल्ले चढविले. या संघर्षात ४९ पॅलेस्टिनी तर दोन इस्रायलींचा बळी गेला होता. या दोन्ही संघर्षांमध्ये इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेने यशस्वी कामगिरी बजावली होती.

पॅलेस्टाईनचा भूभाग असलेल्या वेस्ट बँकमध्ये इस्रायली लष्कराने केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून २०२१ व २०२२ साली गाझापट्टीतून हे हल्ले चढविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वेस्ट बँकच्या हद्दीत इस्रायलविरोधी कारवाया वाढल्याचा दावा केला जातो. इस्रायलच्या लष्करानेही वेस्ट बँकच्या जेनिन शहरात केलेल्या कारवाईत इस्लामिक जिहादशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांना ठार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर जेरूसलेममधील ज्यूधर्मियांच्या प्रार्थनास्थळाच्या आवारात दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात दहा इस्रायलींचा बळी गेला होता.

इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई करून दहशतवाद्यांना तसेच त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले होते. पण इस्रायलने वेस्ट बँकमध्ये केलेल्या या कारवाईला उत्तर म्हणून सलग दोन आठवडे गाझातून रॉकेट्सचे हल्ले झाले. इस्रायलच्या आयर्न डोमने हमासचे हे रॉकेट हल्ले उधळले. पण येत्या काळातही हमास व इस्लामिक जिहादकडून इस्रायलवर रॉकेट हल्ल्यांची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाले तर यावेळी इस्रायलकडून प्रत्येक रॉकेट हल्ल्याला ५० क्षेपणास्त्रांनी उत्तर दिले जाईल, ही अंतर्गत सुरक्षामंत्री बेन-ग्वीर यांनी दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरविला जाऊ शकतो. इस्रायलवरील हल्ल्यांना व्यापक स्वरुपात उत्तर देण्याचे बेन-ग्वीर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर वेस्ट बँकमधून इस्रायलींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी बंदूकांच्या परवान्यात पाच पट वाढ करण्यात येईल, स्वसंरक्षणासाठी इस्रायली नागरिकांनी बंदूकांचा वापर करावा, असेही बेन-ग्वीर यांनी जाहीर केले.

जगभरातील छाबाड केंद्रांना आयएसच्या हल्ल्यांचा धोका

isisवॉशिंग्टन – ‘आयएस’ व संलग्न दहशतवादी संघटना जगभरातील ज्यूधर्मियांच्या छाबाड सेंटर्सवर हल्ले चढवून मोठे हत्याकांड घडविण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभरातील छाबाड सेंटर्सना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या सेंटर्सना जवळच्या पोलीस स्थानकांच्या संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

‘छाबाड वर्ल्ड असिस्टन्स-सीडब्ल्यूए’ या संघटनेने जगभरातील आपल्या केंद्रांना हा इशारा जारी केला. आठवड्यापूर्वी युरोपिय देशांमध्ये इस्लामधर्मियांविरोधात काही अप्रिय घटना घडत आहेत. त्याचा सूड घेण्यासाठी आयएसचे दहशतवादी युरोपिय देशांबरोबरच जगभरातील छाबाड केंद्रांवरही हल्ले चढवू शकतात, असे सीडब्ल्यूएने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच आयएसने ज्यूधर्मियांच्या ठिकाणांवरील हल्ल्यासंबंधी पत्रके प्रसिद्ध केली होती, याची आठवण सीडब्ल्यूएचे राबी शिओमो पेलेस आणि मोशे फ्लिशमन यांनी करुन दिली. या पार्श्वभूमीवर छाबाड सेंटर्ससह जगभरातील ज्यूधर्मियांशी निगडीत असलेल्या इतर ठिकाणांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

leave a reply