अणुकार्यक्रमाबाबतच्या मुद्यांवर इराणवर विश्वास ठेवता येणार नाही

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने फटकारले

grossi raisiवॉशिंग्टन/तेहरान – इराणने फोर्दो अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेसची मांडणी व युरेनिअमच्या संवर्धनात मोठे बदल केले आहेत. त्यातच इराणने याबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगालाही अंधारात ठेवले आहे. त्यामुळे अणुकार्यक्रमाबाबत पाश्चिमात्य देशांना आश्वासन देणाऱ्या इराणवर विश्वास ठेवता येणार नाही, असा आरोप अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने संयुक्त निवेदनातून केला. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने याविषयी तयार केलेला अहवाल इराणने धुडकावला आहे. पण अमेरिका व युरोपिय मित्रदेशांनी सदर अहवाल उचलून धरत इराणला लक्ष्य केले आहे. अमेरिका व फ्रान्सच्या नेत्यांची इस्रायलच्या पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीनंतर पाश्चिमात्य देशांनी इराणबाबत सदर निवेदन प्रसिद्ध केले आहे.

इराणने डोंगराच्या पायथ्याशी भुयारात बांधलेला फोर्दो अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय टीकेचे लक्ष्य ठरला आहे. अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रयत्नात असलेल्या इराणने सदर प्रकल्पात छुप्या हालचाली सुरू केल्याचा आरोप इस्रायलने फार आधी केला होता. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने देखील सदर अणुप्रकल्पातील युरेनिअमच्या संवर्धनाच्या संख्येवर संशय व्यक्त केला होता. या प्रकल्पातील युरेनिअमचे संवर्धन इराणला अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ नेणारे असल्याचा दावा अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी केला होता.

IAEAयामुळे संतापलेल्या इराणने आयोगाच्या निरिक्षकांना सदर प्रकल्पाचे दरवाजे बंद केले होते. पण इराणच्या या निर्णयाने फोर्दो अणुप्रकल्पाबाबतचा संशय बळावल्याची टीका आयोगाचे अधिकारी करू लागले होते. काही आठवड्यांपूर्वी इराणने आयोगाच्या निरिक्षकांवर टाकलेली बंदी माघारी घेतल्यानंतर फोर्दो अणुप्रकल्पाबाबतची पारदर्शकता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. पण 21 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांनी अचानक फोर्दो प्रकल्पाला भेट द्ेऊन येथील अणुकार्यक्रमाची पाहणी केली. यावेळी सदर प्रकल्पात धक्कादायक बदल पाहिल्याचे आयोगाने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे.

फोर्दो प्रकल्पात सेंट्रिफ्यूजेसचे दोन नवे कॅस्केड बसविण्यात आले होते. त्याचबरोबर या कॅस्केडची मांडणी व जोडणी अतिशय वेगळ्या पद्धतीने केली होती. इराणने आश्वासन दिल्याप्रमाणे नव्या कॅस्केडची मांडणी व त्याची पुढील जोडणी जुळत नसल्याचा आरोप आयोगाने आपल्या अहवालात केला. फोर्दो अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेस 60 टक्के शुद्धतेचे उच्च स्तरावरील संवर्धित युरेनिअमची निर्मिती करीत असल्याचे आयोगाने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे इराण फोर्दो अणुप्रकल्पातील हालचालींबाबत आयोगाला अंधारात ठेवत असल्याची टीका सुरू झाली होती.

इराणने आयोगाचे हे आरोप फेटाळले. आयोगाने अतिशय अव्यावसायिकरित्या हे प्रकरण हाताळले असून सदर अहवालात चुकीची माहिती दिल्याचे इराणने म्हटले आहे. पण या अहवालाची दखल घेऊन अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या मित्रदेशांनी इराणवर ताशेरे ओढले. फोर्दो अणुप्रकल्पातील सेंट्रिफ्यूजेसची मांडणी आणि युरेनिअमच्या संवर्धनात बदल करणाऱ्या व त्यापासून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाला अंधारात ठेवणाऱ्या इराणने अण्वस्त्र प्रसारबंदी विधेयकाचे उल्लंघन केले आहे. यापुढे आण्विक जबाबदाऱ्यांबाबत इराणवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी टीका पाश्चिमात्य देशांनी संयुक्त निवेदनातून केली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी इस्रायलचा दौरा करून पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची भेट घेतली. इराणच्या धोक्याविरोधात अमेरिका व इस्रायलमध्ये एकमत असल्याची घोषणा करण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी फ्रान्सचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी इराणबाबत चर्चा केली. यावेळीही इराणच्या धोक्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर पाश्चिमात्य देशांनी इराणविरोधात ही घोषणा केल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

हिंदी

leave a reply