इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या एजंट्सना पकडल्याचा इराणचा दावा

तेहरान – इराणने अणुशास्त्रज्ञांच्या हत्येचा कट उधळल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या एजंट्सना ताब्यात घेतल्याची घोषणा इराणने केली. इराणच्या शास्त्रज्ञ व रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद मृत्यूचे सत्र सुरू असताना, इराणने केलेली ही घोषणा लक्षवेधी ठरते. याआधीही आपल्या शास्त्रज्ञ व लष्करी अधिकाऱ्यांच्या संशयास्पद हत्येसाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले होते.

इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांताच्या न्यायविभागाचे वरिष्ठ अधिकारी मेहदी शम्साबादी यांनी तिघांना अटक केल्याची माहिती दिली. आठ महिन्यांपासून इराणची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या एजंट्सवर पाळत ठेवून होती. अतिशय अवघड असलेल्या या मोहिमेद्वारे या एजंट्ना ताब्यात घेतल्याचे शम्साबादी यांनी सांगितले. इराणच्या अणुशास्त्रज्ञांवर हल्ल्याची योजना आखल्याची कबुली या एजंट्सनी दिली. तसेच इतरही पुरावे या कारवाईनंतर हाती सापडल्याचा दावा शम्साबादी यांनी केला.

इराणच्या यंत्रणेने अटक झालेल्यांचे नागरीकत्व जाहीर करण्याचे टाळले. पण अटक झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे इराणी माध्यमांचे म्हणणे आहे. सदर महिलेने याआधी इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात काम केले होते. सध्या सदर महिला सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात प्रशासकीय पदावर होती, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित गोपनीय माहिती गहाळ करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून इराण आणि इस्रायलमध्ये छुपे युद्ध सुरू असल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. इराणचा अणुकार्यक्रम आणि रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित अधिकारी व जवानांची हत्या किंवा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. 2020 साली इराणच्या अणुकार्यक्रमातील प्रमुख शास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसाद जबाबदार असल्याचा आरोप इराणने केला होता. त्यानंतर इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या संशयास्पद स्फोटामागेही मोसाद असल्याची टीका झाली होती.

इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या या कारवाईला इराणमधून सहाय्य मिळत असल्याची चर्चा इराणच्या माध्यमांमधून सुरू होती. दीड वर्षापूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी मोसादचे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये इराणमधील अणुशास्त्रज्ञ व रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या संशयास्पद हत्येची तीव्रता वाढली. यामुळे पुन्हा एकदा मोसादच्या नेटवर्कचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याचा परिणाम म्हणून इराणने आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना पदावरुन दूर केल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत इराणने मोसादच्या एजंट्सना पकडल्याचा दावा केला आहे. या एजंट्सवर लवकरच कारवाई करणार असल्याची घोषणा इराणने केली आहे.

leave a reply