अमेरिकेच्या पेंटॅगॉनकडून ‘स्पेस बेस्ड् रॅपिड रिॲक्शन फोर्स’च्या हालचाली

- एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसेक्स'शी करार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षणविभागाच्या ‘ट्रान्सपोर्टेशन कमांड’ने ‘स्पेस बेस्ड् रॅपिड रिॲक्शन फोर्स’ उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी ‘ट्रान्सपोर्टेशन कमांड’ने आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ या कंपनीशी करार केल्याचे समोर आले. अंतराळयानाच्या माध्यमातून जगातील कोणत्याही भागात एक तासात आवश्यक सहाय्य पोहोचविण्यात येऊ शकते, असा दावा संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या सहाय्यात लष्करी सहाय्यापासून ते आप्तकालिन स्थितीत आवश्यक असणाऱ्या मदतीचा समावेश असेल, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला.

‘द इंटरसेप्ट’ या न्यूज वेबसाईटने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘फ्रीडम ऑफ इन्फोर्मेशन ॲक्ट’अंतर्गत केलेल्या अर्जातून मिळविलेल्या माहितीच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात येत असल्याचे वेबसाईटने म्हटले आहे. अमेरिकेच्या ‘ट्रान्सपोर्टेशन कमांड’वर जगभरातील अमेरिकी तळांवर आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. या कमांडचे वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या जनरल स्टिफन लिऑन्स यांनी 2020साली यासंदर्भात सादरीकरण केले होते. या सादरीकरणात त्यांनी ‘स्पेसेक्स’ या कंपनीशी प्राथमिक करार झाल्याचीही माहिती दिली होती.

अमेरिकी लष्कराच्या ‘सी-17′ या मालवाहू विमानाने जितके सामान नेता येईल तितके सामान एका तासाच्या आत जगातील कोणत्याही भागात पाठविणे ही ‘स्पेस बेस्ड् रॅपिड रिॲक्शन फोर्स’मागील मुख्य संकल्पना असल्याचे जनरल लिऑन्स यांनी सांगितले. ‘स्पेसेक्स’च्या अंतराळयानाद्वारे आवश्यक सहाय्य थेट अवकाशात प्रक्षेपित करून पृथ्वीवर हव्या त्या भागात उतरविण्याची योजना असल्याचे लिऑन्स यांनी स्पष्ट केले. सध्या ही योजना प्रायोगिक अवस्थेत असून येत्या दशकभरात ‘स्पेस बेस्ड् रॅपिड रिॲक्शन फोर्स’ कार्यरत झालेला दिसू शकतो, असा दावाही ‘ट्रान्सपोर्टेशन कमांड’कडून करण्यात आला आहे.

‘ट्रान्सपोर्टेशन कमांड’ने आपल्या एका अहवालात तीन शक्यतांचा उल्लेख केला आहे. त्यातील पहिला उल्लेख पॅसिफिक क्षेत्रात ‘लॉजिस्टिक्स डिलिव्हरी’साठी पर्याय असा आहे तर दुसऱ्यात ‘एअरफोर्स डिप्लॉयेबल एअर बेस सिस्टिम’चा उल्लेख आहे. तिसरी शक्यता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागासाठी ‘एम्बसी सपोर्ट’ अशी सांगण्यात आली आहे. त्यानुसार आफ्रिका खंड अथवा इतर भागात झटपट लष्करी पथक तैनात केले जाऊ शकते.

leave a reply