इराण अणुप्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा तपास करणार

सीसीटीव्हीतेहरान – आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुप्रकल्पात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर करून इस्रायलने अणुकार्यक्रमावर हल्ले चढविल्याचा संशय इराणने व्यक्त केला आहे. या सीसीटीव्हीचा तपास सुरू असल्याची माहिती ब्रिटनमधील इराणच्या राजदूतांनी दिली. या कारणास्तव अणुऊर्जा आयोगाला अणुप्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरूस्त करण्याची परवानगी नाकारल्याचा दावा इराण करीत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढविल्याची चिंता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग व्यक्त करीत आहे. इराणने सेंट्रिफ्युजेस आणि युरेनियम संवर्धनाचा वेग वाढविला असून इराण अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना अणुप्रकल्पात परवानगी देत नसल्याची तक्रार आयोगाने केली होती. त्याचबरोबर इराणने अणुप्रकल्पांमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची दुरूस्ती आणि नवे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे नाकारल्यामुळे अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमावर संशय व्यक्त केला होता.

सीसीटीव्हीपण ब्रिटनमधील इराणचे राजदूत मोहसेन बहरवंद यांनी याबाबत नवी माहिती दिली. इराणच्या अणुप्रकल्पात स्फोट घडविण्यासाठी इस्रायलने अणुऊर्जा आयोगाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर केल्याची शक्यता बहरवंद यांनी वर्तविली. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून इस्रायलने अणुप्रकल्पातील हालचाली टिपल्याचा दावा इराणच्या राजदूतांनी केला. तर अणुऊर्जा आयोगाला परवानगी नाकारण्यासाठी इराणने केलेला दावा हास्यास्पद असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.

इराण आपल्या अणुकार्यक्रमाची प्रगती लपविण्यासाठी तसेच व्हिएन्ना येथील चर्चेत वेळ मारून नेण्यासाठी ही कारणे पुढे करीत असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. दरम्यान, इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचत असल्याचा आरोप इस्रायलचे नेते करीत आहे. इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी इस्रायल एकतर्फी कारवाई करू शकतो, असे संकेत इस्रायलच्या नेत्यांनी याआधीच दिले आहेत.

leave a reply