इराण इस्रायलला मोठ्या वणव्यात ढकलत आहे

आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा इशारा

israel syria strikeजेरूसलेम – गाझापट्टी आणि लेबेनॉनमधून झालेले रॉकेट्सचे हल्ले व त्यानंतर सिरियाच्या हद्दीतून इस्रायलमधील ड्रोन्सची घुसखोरी व क्षेपणास्त्रांचा मारा इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देत आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलच्या लष्कराने या सर्व हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. पण एकाचवेळी गाझापट्टी, लेबेनॉन आणि सिरियातून हल्ले चढवून इराण इस्रायलला मोठ्या वणव्याकडे ढकलत असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात गाझापट्टी आणि लेबेनॉनच्या हद्दीतून इस्रायलवर सुमारे ७८ रॉकेट्सचा मारा झाला. हमास आणि हिजबुल्लाहने संयुक्तरित्या हे हल्ले चढविले असले तरी यामागे इराण असल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. इराणने या दोन आघाड्यांवर इस्रायलच्या दोन सीमेजवळ संघर्षस्थिती निर्माण केली आहे. त्याचबरोबर जुडाय आणि समारीया या दोन इस्रायली शहरांमध्ये इस्रायलविरोधी संघर्ष उभा केला जात आहे. या दोन शहरातून इस्रायली नागरिक तसेच जवानांवर हल्ले केले जात आहे.

इस्रायलने आत्तापर्यंत गाझापट्टी आणि लेबेनॉनमधून होणाऱ्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पण देशांतर्गत सुरू असलेला संघर्ष रोखण्यात इस्रायल यशस्वी ठरलेला नाही. अशाप्रकारे इराणने एकाचवेळी चार आघाड्यांवर इस्रायलविरोधात वणवा पेटविला आहे, याकडे इस्रायलच्या माजी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने लक्ष वेधले. पण इराणची इस्रायलविरोधी कारवाई इथेच थांबलेली नाही. गेल्या आठवड्यात सिरियाच्या हद्दीतून उड्डाण केलेल्या इराणच्या ड्रोनने इस्रायलमध्ये घुसखोरी केली होती. तर दोन दिवसांपूर्वी सिरियातून इस्रायलवर रॉकेट्सचा मारा झाला.

big wildfireइस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियातील ठिकाणांना लक्ष्य केले. पण यामुळे इराणने एकाचवेळी गाझा, लेबेनॉन, सिरिया तसेच देशांतर्गत आघाडीवर इस्रायलच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण केल्याची आठवण आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी दिली. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय राजकारणातही इराणने इस्रायलला एकटे पाडल्याचा दावा या विश्लेषकांनी केला.

इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत गेल्या काही दिवसांपासून लक्षवेधी माहिती समोर येत आहे. बायडेन प्रशासनाने इस्रायल आणि युरोपिय मित्रदेशांना पूर्वकल्पना न देता इराणबरोबर अंतरिम अणुकरार करण्यासाठी हालचाली वाढविल्या आहेत. याअंतर्गत इराणवरील निर्बंध शिथिल करुन आर्थिक सवलती देण्याची तयारी बायडेन प्रशासनाने केल्याचा दावा अमेरिकेतील वृत्तसंस्थेने केला होता. अजूनही बायडेन प्रशासनाने ही बातमी खोडून काढलेली नाही. त्यामुळे अमेरिका इराणबरोबरच्या अणुकरारावर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याचबरोबर इराणने अणुबॉम्बची निर्मिती केली तरी बायडेन प्रशासनाला आक्षेप नसल्याचे संकेत अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी दिले होते. यावरुन बायडेन प्रशासनाने आपल्या इराणबाबतच्या भूमिकेत बदल केल्याची नाराजी इस्रायलने व्यक्त केली होती. त्याचवेळी इराणने सौदी अरेबियाबरोबर संबंध सुरळीत करण्यासाठी पावले उचलली आहेत. इस्रायलशी अब्राहम करार केलेल्या युएई आणि बाहरिन या देशांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठीही इराणकडून असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे इराणने हळुहळू इस्रायलला मोठ्या वणव्याकडे ढकलल्याचा इशारा हे विश्लेषक देत आहेत.

leave a reply