भारत-ब्रिटन मुक्त व्यापारी करारावरील चर्चा थांबलेली नाही

ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाचा खुलासा

नवी दिल्ली – ब्रिटनच्या संसदेचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले आहे. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू असताना, सदर शिष्टमंडळाची भारतभेट लक्ष वेधून घेणारी असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र भारताने ब्रिटनबरोबरील मतभेदांमुळे ही व्यापारी चर्चा खंडीत केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण ही चर्चा खंडीत करण्यात आलेली नाही व याबाबतच्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तालयाने केला आहे.

india-uk free trade agreementखलिस्तानी विघटनवाद्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ले चढविले होते. इथला भारताचा राष्ट्रध्वज काढण्यापर्यंत या विघटनवाद्यांची मजल गेली. तरीही स्थानिक पोलीस दलाने या विघटनवाद्यांना रोखले नव्हते. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी इथले पोलीस दल उत्सुक नसल्याचे आरोप झाले होते. यानंतर भारताने नवी दिल्लीतील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाला दिलेल्या सुरक्षेत कपात केली होती. भारत अशारितीने आपली नाराजी व्यक्त करू लागल्यानंतर, ब्रिटनने भारताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता.

भारत व ब्रिटनमध्ये मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा अजूनही पुढे सरकली नसून ब्रिटनच्या भारतविरोधी भूमिकेमुळे त्यात वारंवार खंड पडत असल्याचे दिसत आहे. भारताच्या हितसंबंधांना आव्हान देऊन भारताशी व्यापारी वाटाघाटी करता येऊ शकत नाहीत, याची जाणीव भारत वेगवेगळ्या मार्गाने ब्रिटनला करून देत आहे. सध्या ब्रिटनच्या संसदेचे शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आले आहे. सहा वर्षानंतर पहिल्यांदाच ब्रिटिश संसदेच्या सर्वपक्षीय संसद सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात आले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील मुक्त व्यापारी करारावरील चर्चा पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. त्याचवेळी भारताने ही चर्चा पुढे ढकलल्याच्या बातम्या आल्या आहेत. भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण त्यात तथ्य नसल्याचा खुलासा ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तालयाला करावा लागला आहे.

leave a reply