इस्रायल नाही तर इराणच सौदीचा शत्रू आहे

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन

जेरूसलेम – सौदी अरेबियाने इराणबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यास सुरुवात केल्यामुळे इस्रायल-सौदीमधील सहकार्याची शक्यता धुसर झाल्याचा दावा केला जातो. पण इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठीच सौदीने इराणशी जुळवून घेतले. याद्वारे आपण सहकार्यात संतुलन ठेवत असल्याचा संदेश सौदी देत असल्याचा दावा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी केला. सौदीसाठी इस्रायल नाही, तर इराणच शत्रू देश असल्याचा इशाराही कोहेन यांनी दिला. त्याचबरोबर लवकरच आपण सौदीला भेट देणार असल्याची घोषणा इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

saudi's enemyगेल्या महिन्यात सौदी अरेबियामध्ये आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यटन संघटनेच्या बैठकीमध्ये इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन सहभागी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण वेस्ट बँकमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सौदीने कोहेन यांना दौरा नाकारल्याचे दावे करण्यात आले होते. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौऱ्याला मान्यता दिल्यास सौदीने थेट इस्रायलला मान्यता दिल्याचे संकेत गेले असते. ते टाळण्यासाठी सौदीने कोहन यांची भेट नाकारल्याचे माध्यमांनी म्हटले होते.

यानंतरच्या काही दिवसात सौदी व इराणमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. सात वर्षानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री एकत्र आले व दूतावास सुरू करण्यावरही सौदी व इराणच्या नेत्यांमध्ये चर्चा पार पडली. सौदी व इराणमधील हे सहकार्य म्हणजे इस्रायलसाठी सर्वात मोठा हादरा असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी जानेवारी महिन्यात सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर सौदीबरोबर अब्राहम करार करणार असल्याची घोषणा केली होती.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी यासाठी अमेरिकेकडे विचारणा केल्याच्या बातम्या अमेरिकन माध्यमांनी दिल्या होत्या. इस्रायल व सौदीने या सर्व घडामोडींबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यातच सौदी-इराण सहकार्यामुळे खरोखरच इस्रायल-सौदी यांच्यातील सहकार्य रखडल्याच्या बातम्यांना बळ मिळाले होते. पण अझरबैजानच्या दौऱ्यावर असताना इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी या सर्व चर्चांना विराम दिला. आपण लवकरच सौदीचा दौरा करणार असल्याचे परराष्ट्रमंत्री कोहेन यांनी सांगितले. तसेच सौदीने इराणशी सहकार्य करुन आपण संतुलन साधत असल्याचा संदेश दिला आहे. येत्या काळात इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी सौदीला ते सहाय्यक ठरेल, असा दावा कोहेन यांनी केला.

हिंदी

leave a reply