इंधन कपातीच्या निर्णयावर रशियन राष्ट्राध्यक्ष आणि सौदीच्या क्राऊन प्रिन्सची चर्चा

क्रेमलिनची घोषणा

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात शुक्रवारी फोनवरुन चर्चा पार पडली. या महिन्याच्या सुरुवातीला ‘ओपेक प्लस’ देशांनी इंधनाच्या कपातीबाबत घेतलेल्या लक्षवेधी निर्णयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती क्रेमलिनने दिली. याआधी रशियन व सौदीच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर ‘ओपेक प्लस’ने इंधन कपातीची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील या चर्चेनंतर इंधन उत्पादक देशांची संघटना कोणता नवा निर्णय घेईल, यावर पाश्चिमात्य माध्यमे उलटसुलट चर्चा करीत आहेत.

discuss fuel cutsयुक्रेनचे युद्ध आणि आखातातील घडामोडींनी वेग धरलेला असताना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्यात ही चर्चा झाली. तीन आठवड्यांपूर्वी इंधन उत्पादनाच्या कपातीविषयी घेतलेल्या निर्णयावर तसेच आंतरराष्ट्रीय इंधन बाजारात स्थैर्य आणण्यासाठी दोन्ही देशांमध्ये असलेल्या सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. सदर चर्चा रचनात्मक आणि माहितीपूर्ण होती व अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडल्याचे क्रेमलिनने जाहीर केले.

या महिन्याच्या सुरुवातीला ‘ओपेक प्लस’ देशांचे नेतृत्व करणाऱ्या सौदी अरेबियाने इंधन उत्पादनाबाबत मोठी घोषणा केली होती. इंधन उत्पादक देश या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रतिदिन ११ लाखहून अधिक बॅरल्स इंधन उत्पादनात कपात करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. इंधनाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सौदीने म्हटले होते. सौदीपाठोपाठ युएई, इराक, कुवैत, ओमान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि गॅबॉन या देशांनीही अशीच घोषणा केली.

OPECसौदीने याआधीच पाच लाख बॅरल्स प्रतिदिन इंधनाची कपात सुरू केली होती. तर रशियानेही वर्षअखेरीपर्यंत तितक्याच बॅरल्सची कपात करण्याचा निर्णय घेतला होता, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी लक्ष वेधले होते. अशा परिस्थितीत, ओपेक प्लस देशांचा हा निर्णय अमेरिका व युरोपिय मित्र देशांना हादरा देणारा होता. सौदीच्या या निर्णयावर अमेरिकेने टीका केली होती. इंधन उत्पादनातील कपातीचा हा निर्णय रशियाच्या फायद्याचा असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. सौदीप्रमाणेच ओपेक प्लस गटाचे नेतृत्व करणाऱ्या रशियासाठी सदर निर्णय आर्थिकदृष्ट्या सहाय्यक असल्याचा ठपका अमेरिकन माध्यमांनी ठेवला होता. इंधनाच्या उत्पादनात कपात केल्यामुळे वाढलेल्या दराचा फायदा रशियासाठी होणार असल्याचा दावा या माध्यमांनी केला होता. सौदी व इतर ओपेक प्लस देश अप्रत्यक्षरित्या युक्रेनमधील रशियाच्या युद्धाला सहाय्य करीत असल्याची टीका या माध्यमांनी केली होती.

पण सौदी व इतर ओपेक प्लस देशांवर आरोप करणाऱ्या अमेरिका व युरोपिय देशांनी अजूनही दबक्या पावलांनी रशियाकडून इंधनाची खरेदी सुरू ठेवली आहे, याकडेही विश्लेषक लक्ष वेधत आहेत. इंधनाबरोबरच युरोपमधील काही देश रशियाकडून मौल्यवान डायमंड्सची खरेदी देखील करीत असल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. अमेरिका व युरोपिय देश आपल्यावरील हे आरोप स्वीकारायला तयार नाहीत.

दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्ष आणि सौदीच्या क्राऊन प्रिन्समधील या नव्या चर्चेवर अमेरिका व युरोपिय देशांकडून प्रतिक्रिया आलेली नाही. पण दोन्ही नेत्यांच्या या चर्चेनंतर ओपेक प्लस संघटना नवा निर्णय घेईल, याकडे काही माध्यमे लक्ष वेधत आहेत. तर आखातातील बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरते, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे.

हिंदी

leave a reply