इराणच्या अणुकार्यक्रमावरील चर्चा फसल्यास अमेरिका इतर पर्यायाचा वापर करील

- अमेरिकेचे इस्रायलला आश्‍वासन

इतर पर्यायाचा वापरवॉशिंग्टन – व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या राजकीय वाटाघाटीद्वारे इराणच्या अणुकार्यक्रमाची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करील. यात अपयश आले तर अमेरिका इतर पर्यायांचा विचार करील, असे आश्‍वासन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिले. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत इराण अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये अणुकरार संपन्न होईल, अशी माहिती रशियन विशेषदूतांनी दिली.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन आणि इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एल हुलाटा यांच्यात व्हर्चुअल बैठक संपन्न झाली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून इस्रायल व अमेरिका यांच्या सुरक्षा सल्लागारांमधील ही चौथी बैठक ठरते. गेल्या काही महिन्यांपासून व्हिएन्ना येथे इराणच्या अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटीवर दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा पार पडली. या वाटाघाटींना अपयश मिळाले तर इतर पर्यायांचा वापर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली. पण हे पर्याय कोणते याचे तपशील त्यांनी दिलेले नाहीत. मात्र व्हिएन्ना येथील चर्चेत अणुकराराबाबतची कोंडी फोडण्यात यश मिळाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा पार पडल्याचे बोलले जाते. व्हिएन्ना येथील चर्चेसाठी रशियाने नियुक्ती केलेले विशेषदूत मिखाईल उलियानोव यांनी देखील सदर कराराचे संकेत दिले आहेत.

२०१५ सालचा अणुकरार पुनरुज्जीवित करण्यासाठी व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटींना यश मिळत असल्याचे संकेत रशियाच्या विशेषदूतांनी दिले. या गतीने ही चर्चा सुरू राहिली तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत अणुकरार संपन्न होऊ शकतो असा दावा मिखाईल यांनी केला. असे असले तरी, इराणवरील निर्बंध काढण्यासाठी आणि या करारातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी अमेरिकेला दोन किंवा त्याहून अधिक महिन्याचा कालावधी लागू शकतो, असेही मिखाईल म्हणाले.

काही दिवसांपूर्वी रशियाने इराणला अणुकराराबाबत नवा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती. रशियाने दिलेल्या अंतरिम अणुकराराच्या प्रस्तावानुसार, इराणला आपल्या अणुकार्यक्रमातील युरेनिअमचे संवर्धन ६० टक्क्यांवर थांबवावे लागेल. २०१५ सालच्या अणुकरारात ही मर्यादा फारच कमी होती. त्याचबरोबर इराणने आत्तापर्यंत संवर्धित केलेला युरेनिअमचा साठा नष्ट करावा, अशी अट रशियाने या प्रस्तावात ठेवल्याची माहिती अमेरिकेच्या सरकारी सूत्रांनी ‘एनबीसी’ या वृत्तवाहिनीला दिली. तर अमेरिका व इराणमध्ये छुपा अणुकरार झाल्याचा दावा ब्रिटनमधील अरबी वृत्तसंस्थेने काही दिवसांपूर्वीच केला होता.

leave a reply