भारत-फ्रान्स सहकार्य नव्या उंचीवर नेण्याची वेळ आली आहे

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

भारत-फ्रान्सनवी दिल्ली – धोरणात्मक भागीदारीबाबत बरेच काही बोलले जाऊ शकते. पण भारताच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या लष्करी संचलनात फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केले होते. ही बाब दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीबाबत सारे काही स्पष्ट करीत आहे, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. भारत-फ्रान्सचे संबध परिपक्व बनले असून आता दोन्ही देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्याची वेळ आलेली आहे, असा विश्‍वास भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘द फ्रेंच प्रेसिडेन्सी: इयु-इंडिया पार्टनरशिप इन द इंडो पॅसिफिक’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल चर्चेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बोलत होते. या चर्चेत फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-येस ली द्रियान देखील सहभागी झाले होते. भारत व फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीबाबत बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रफायल लढाऊ विमानांचे उदाहरण दिले. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात रफायल विमाने उड्डाण करीत होती, याचा दाखला देऊन हे दोन्ही देशांमधील धोरणात्मक सहकार्याचे दृश्यमान उदाहरण ठरते, असे जयशंकर म्हणाले.

संरक्षण, आण्विक आणि अंतराळ क्षेत्रात भारत व फ्रान्स एकमेकांचे विश्‍वासू भागीदार देश आहेत. दोन्ही देशांचे हे सहकार्य आता नव्या उंचीवर नेण्याची वेळ आलेली आहे, असा विश्‍वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, फ्रान्सकडे युरोपिय महासंघाचे अध्यक्षपद आले आहे. याचा वापर करून युरोपिय महासंघाबरोरील भारताचे सहकार्य अधिकच दृढ करणार असल्याचे संकेत फ्रान्सने दिले आहेत. विशेषतः युरोपिय महासंघ आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तीव्र मतभेदांच्या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सने भारताबाबत स्वीकारलेली ही भूमिका लक्षवेधी ठरते.

युरोपिय महासंघाचे सदस्य असलेले काही देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य पुरवित आहेत. फ्रान्सने पाकिस्तानला मिळणार्‍या या सहकार्यावर बंदी घालावी, अशी मागणी भारताने केली आहे. युरोपिय महासंघाच्या अध्यक्षपदाचा वापर करून पाकिस्तानला मिळणारी ही शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य रोखण्याचे काम फ्रान्स करू शकतो. त्यामुळे भारताने केलेली ही मागणी पाकिस्तानच्या चिंता वाढविणारी ठरली होती.

leave a reply