अल कायदाच्या दहशतवाद्यांना इराणचा आश्रय – अमेरिकेचा आरोप

वॉशिंग्टन – इराण हा दहशतवादाचा सर्वात मोठा प्रायोजक आहे. हिजबुल्लाह, हमास यांच्याबरोबरच इराण अल कायदाच्या दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. अल कायदाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि पैसा पुरवून इराण या दहशतवाद्यांना अफगाणिस्तान व सिरियामधील संघर्षात उतरवीत असल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नव्या अहवालात केला आहे. पण अमेरिकेने टाकलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांमुळे इराणच्या या दहशतवादी कारवायांवर लगाम घालणे शक्य झाले असून यापुढेही अमेरिकेकडून इराणवरील निर्बंध कायम राहतील, अशी घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या अहवालातून केली.

अल कायदा, इराण, अमेरिका, इराणचा आश्रय

इराणच्या राजवटीला अल कायदाच्या बड्या नेत्यांना आपल्या देशात आश्रय दिला आहे. पण इतर दहशतवादी संघटनांप्रमाणे इराण अल कायदाचा दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे मान्य करण्यास तयार नाही. २००९ सालापासून इराण अल कायदाच्या दहशतवाद्यांचा वापर करून अफगाणिस्तान आणि सिरियामध्ये मोठा दहशतवाद पसरवीत असल्याचा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवाद आणि दहशतवाद समर्थक देशांबाबतच्या वार्षिक अहवालात ठेवला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अल कायद्याच्या दहशतवाद्यांची नावे जाहीर करण्याचे टाळले. याआधी अमेरिकेने इराणवर अल कायदाला आश्रय देत असल्याचा आरोप केला होता. मात्र आपल्या वार्षिक अहवालात इराण आणि अल कायदामधील लागेबांधे मांडून अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बंधांची घोषणा केली आहे.

दहशतवादाचा प्रायोजक असणारा इराण हिजबुल्लाह आणि हमास या दहशतवादी संघटनांच्या सहाय्याने इराक, सिरिया आणि संपूर्ण आखातात अस्थैर्य माजवित असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इराणची ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (आयआरजीसी) आणि ‘कुद्स फोर्सेस’ या दहशतवादी संघटना देखील यासाठी सहाय्य करीत असल्याचे सदर अहवालात म्हटले आहे. आतापर्यंत दहशतवादाचा प्रायोजक असणाऱ्या इराणवर अमेरिकेने मोठी कारवाई केली नव्हती. पण गेल्या वर्षी अमेरिकेने टाकलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांमुळे इराणकडून या दहशतवाद्यांना मिळणारी रसद तोडली गेल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. ‘आयआरजीसी’ आणि कुद्स फोर्सेस यांच्यावरील कारवाईने इराणला जबर फटका बसल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अमेरिकेने ‘आयआरजीसी’ आणि कुद्स फोर्सेस यांना दहशतवादी संघटना जाहीर केले. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांना इराकमधील हवाई हल्ल्यात ठार करून इराणला मोठा हादरा दिला होता. त्याचबरोबर काही वर्ष इराणमध्ये आश्रय घेतलेल्या अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा बिन लादेन यालाही अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केले होते.

leave a reply