अफगाणिस्तानातील दहशतवादाविरोधात इराण व ताजिकिस्तानमध्ये सहकार्य

तेहरान – रशिया-युक्रेन युद्ध आणि अफगाणिस्तानातील अस्थैर्य यामुळे मध्य आशियाई देशांना असलेला दहशतावादाचा धोका वाढत आहे. याची जाणीव झालेल्या इराण आणि ताजिकिस्तान या अफगाणिस्तानच्या शेजारी देशांनी दहशतवादाविरोधात सहकार्य वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्यात ताजिकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणचा दौरा केला होता. त्यावेळी हे सहकार्य प्रस्थापित झाल्याचा दावा केला जातो.

इराण आणि ताजिकिस्तान हे अफगाणिस्तानचे शेजारी देशआहेत. गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपली राजवट प्रस्थापित केल्यानंतर या दोन्ही देशांनी दहशतवादापासून आपल्या सीमेला धोका असल्याची चिंता व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत, गेल्या महिन्यात ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमअली रहमोन यांनी इराणचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची भेट घेतली.

ताजिकिस्तान आणि इराणच्या नेत्यांमधील चर्चेनंतर आर्थिक, व्यापारी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करण्यासंबंधी करार झाले होते. याबरोबरच उभय देशांमध्ये सुरक्षेच्या आघाडीवरही स्वतंत्र सहकार्य होऊ शकते, असे संकेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले होते. याबाबतची माहिती आता समोर येत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित केली असली तरी या देशातील दहशतवादी कारवायांमध्ये फरक पडलेला नाही. अफगाणिस्तानातील आयएस आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवाया आपल्या देशाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकतात, याची जाणीव इराण व ताजिकिस्तानला झाली आहे. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही देशांनी अफगाणिस्तानातील दहशतवादाविरोधात सहकार्य वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, तालिबानला अफगाणिस्तानच्या सत्तेवर बसवून आमच्याविरोधात कट रचल्याचा आरोप इराणने केला होता. तर ताजिकिस्तानने तालिबानची राजवट मान्य नसल्याचे ठणकावले आहे. तसेच अफगाणिस्तानातील नॉर्दन रेझिस्टन्स फ्रंट या तालिबानविरोधी गटाला ताजिकिस्तान सहाय्य पुरवित असल्याचा दावा केला जातो.

दोन दशकांपूर्वी देखील अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीविरोधात इराण, ताजिकिस्तान यांच्याबरोबर भारत आणि रशिया या देशांनीहीआघाडी उघडली होती.

leave a reply