इंडो-पॅसिफिक क्षेत्राला भारताचे लष्करी सामर्थ्य स्थैर्य प्रदान करील

- अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा

लष्करी सामर्थ्यसिंगापूर – मुक्त व स्वतंत्र इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. अमेरिकेच्या सुरक्षाविषयक धोरणाचे हे केेंद्र ठरते, असा दावा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केला. भारताचे लष्करी सामर्थ्य इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्य प्रस्थापित करू शकेल, असा विश्वास अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. सिंगापूर येथे सुरू असलेल्या शांग्री-ला या सुरक्षाविषयक बैठकीत संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन बोलत होते. यावेळी त्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्र व तैवानला चीनपासून संभवणाऱ्या धोक्यांचा जाहीरपणे उल्लेख केला.

तैवानचा ताबा मिळविण्यासाठी चीन युद्ध करू शकतो, असे सांगून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी यावर चिंता व्यक्त केली. इंडो-पॅसिफिकमधील क्षेत्रांवर चीनने आक्रमकपणे दावे ठोकले आहेत. तसेच या क्षेत्रातील चीनच्या कारवाया देखील तणाव वाढवित आहेत. तसेच भारताबरोबरील सीमेवर देखील चीन अधिकाधिक कठोर भूमिका स्वीकारत असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत अमेरिका भारताबरोबरील आपल्या संरक्षणविषयक सहकार्याशी बांधिल आहे, अशी घोषणा संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी केली.

अमेरिकन लष्कराच्या पॅसिफिक कमांडचे जनरल चार्ल्स फ्लिन यांनी आपल्या भारतभेटीत लडाखच्या एलएसीजवळील चीनच्या कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. आता अमेरिकेचे संरक्षणमंत्री देखील एलएसीवरील चीनच्या कारवायांचा दाखला देऊन अमेरिका भारताच्या मागे ठामपणे उभी राहणार असल्याचे म्हटले आहे. भविष्यात चीनने भारताविरोधात कारवाई केलीच, तर अमेरिका त्याविरोधात भारताला संपूर्ण सहकार्य करील, असे आश्वासन अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी भारताच्या लष्करी सामर्थ्यावरचा विश्वासही अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.

भारताचे लष्करी सामर्थ्य व भारत विकसित करीत असलेले तंत्रज्ञान इंडो-पॅसिफिक क्षेत्राला स्थैर्य प्रदान करणारी शक्ती ठरू शकते, असे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात जपानच्या टोकिओमध्ये पार पडलेल्या क्वाडच्या बैठकीत जगाला सर्वाधिक प्रमाणात सुरक्षा व समृद्धी पुरविणारे देश एकत्र आले होते. क्वाडचे सदस्यदेश असियान आणि पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांशी सहकार्य करण्यासाठी उत्सूक आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया व जपान-फिलिपाईन्स, यांच्यात टू प्लस टू चर्चा पार पडली आहे. अमेरिकाही या क्षेत्रातील देशांशी संवाद वाढविण्यासाठी उत्सूक आहे, असा दावा ऑस्टिन यांनी केला.

अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी चीनपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवायांना विरोध केला असला तरी अमेरिकेत बायडेन प्रशासनाची सत्ता आल्यानंतर चीनच्या या कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. बायडेन प्रशासन सत्तेवर येत असतानाच, काही विश्लेषकांनी याबाबत इशारे दिले होते. ओबामा प्रशासनात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन कार्यरत होते. त्यांच्या प्रशासनातच चीनला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात विस्तार करण्याची मोठी संधी मिळाली होती. ज्यो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर, पुन्हा चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्ववादी कारवायांमध्ये वाढ झाली, हा योगायोग ठरत नाही.

बायडेन प्रशासन चीनच्या विरोधात आक्रमक शेरेबाजी करीत असले, तरी ठोस कारवाई करीत नाही, अशी टीका अमेरिकेचे विरोधी पक्षनेते करीत आहेत. त्यामुळेच बायडेन प्रशासनाला चीनच्या विरोधात अधिक आक्रमक भाषेचा प्रयोग करावा लागत आहे. पण चीनवर याचा काहीही प्रभाव पडलेला नाही, हे चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्ववादी कारवायांमुळे उघड होत आहे.

leave a reply