इराणकडून भूमिगत क्षेपणास्त्रांचा तळ उघड

तेहरान – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) होर्मुझच्या आखाताजवळील आपल्या क्षेपणास्त्रांच्या भूमिगत तळाची माहिती उघड केली. शत्रूच्या युद्धनौकांना गारद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रांमध्ये असल्याची घोषणा इराणच्या ‘आयआरजीसी’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केली. त्याचबरोबर ‘आयआरजीसी’ने पर्शियन आखातात ७०० हून अधिक छोट्या-मोठ्या गस्तीनौका आणि स्पीडबोट्ससह मोठा युद्धसराव आयोजित केला. इराणच्या या हालचाली पर्शियन आखातातून प्रवास करणार्‍या परदेशी इंधनवाहू, व्यापारी जहाजे तसेच अमेरिकेच्या युद्धनौकांसाठी इशारा असल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

‘आयआरजीसी’चे वरिष्ठ कमांडर जनरल हुसेन सलामी यांनी शुक्रवारी इराणी पत्रकारांना क्षेपणास्त्रांच्या नव्या भूमिगत तळावर आमंत्रित केले होते. सदर तळ होर्मुझच्या आखातानजिक आहेत. असे आणखी काही तळ या क्षेत्रात भूमिगत असल्याची माहिती जनरल सलामी यांनी दिली. मात्र त्याचे तपशील जनरल सलामी यांनी दिलेले नाहीत. इराणच्या माध्यमांनी देखील आपल्या बातम्यांमध्ये या तळाचे ठिकाण उघड केले नाही.

सदर तळावर क्षेपणास्त्रांचा साठा असल्याचे जनरल सलामी म्हणाले. इराणच्या सागरीसीमेच्या तसेच देशाच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी इराणने अशा क्षेपणास्त्र तळांची निर्मिती केल्याचे जनरल सलामी यांनी सांगितले. यामध्ये शेकडो किलोमीटरपर्यंत अचूकपणे मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लष्करी तळावर ट्रकमधून वाहतूक करता येणार्‍या क्षेपणास्त्रांचा देखील समावेश आहे.

तसेच इराणच्या नौदलाने आणि बसिज निमलष्करीदलाने पर्शियन आखातात युद्धसरावाचे आयोजन केले होते. यात इराणच्या नौदलातील ७०० हून अधिक गस्तीनौका व वेगवान बोटींचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने पर्शियन आखातासाठी ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका रवाना केली आहे. तसेच ‘युएसएस जॉर्जिया’ ही आण्विक पाणबुडीही या क्षेत्रात तैनात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, इराणने केलेला गस्तीनौकांचा सराव आणि होर्मुझच्या आखाताजवळील क्षेपणास्त्रांचे तळ उघड करून अमेरिकेला आपल्यावरील हल्ल्याचे परिणाम भीषण असतील, असे बजावण्याचा प्रयत्न केला आहे.

leave a reply