इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची हमासच्या नेत्याशी चर्चा

तेहरान – इस्रायलची राजवट दुबळी बनली असून पॅलेस्टिनी अधिक बलशाली बनले आहेत. यामुळे इस्रायल पॅलेस्टिनींसमोर टिकाव धरू शकणार नाही, असा विश्‍वास इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दुल्लानियाह यांनी व्यक्त केला आहे. पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीतील आक्रमक संघटना हमासचे प्रमुख नेते इस्लामाईल हनिया यांच्याबरोबरील चर्चेत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा दावा केला. तर इराणच्या लष्कराचे आघाडीचे पथक असलेल्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने इस्रायलविरोधात खडे ठाकणार्‍या पॅलेस्टिनींची प्रशंसा केली. पुढच्या काळात पॅलेस्टिनींना इस्रायलच्या विरोधात आवश्यक ते सहाय्य पुरविले जाईल, असे रिव्होल्युशनरी गार्डस्ने जाहीर केले आहे.

हमासच्या नेत्याशी चर्चाअल अक्सा प्रार्थनास्थळावर इस्रायलने कारवाई केली असून यात दिडशेहून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाल्याचे सांगितले जाते. या कारवाईचा इराणने निषेध नोंदविला असून याची दखल न घेणार्‍या अरब देशांवर टीकेची झोड उठविली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना इस्रायलच्या या कारवाईला विरोध करण्यास तयार नाही, याकडेही इराणने लक्ष वेधले आहे. या पार्श्‍वभूमीवर, इराणचे परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दोल्लानियाह यांनी हमासचे नेते इस्माईल हानिया यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत इराणच्या पराष्ट्रमंत्र्यांनी कमकुवत बनलेली इस्रायलची राजवट बलशाली बनत चाललेल्या पॅलेस्टिनींसमोर टिकाव धरू शकणार नाही, असा विश्‍वास व्यक्त केला. हमास देखील इस्रायलला उघडपणे युद्धाच्या धमक्या देत आहे. सलग सहा महिने इस्रायलशी युद्ध करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याची घोषणा हमासने केली होती.

हमासकडे क्षेपणास्त्रांचा फार मोठा साठा असून इराण हमासला अधिकाधिक शस्त्रसज्ज करीत असल्याचे आरोप केले जातात. इराणच्या अणुकार्यक्रमामुळे आपली सुरक्षा धोक्यात आली आहे, असे मानणारे आखाती देश आता इस्रायलबरोबरील लष्करी सहकार्य वाढवित आहेत. अमेरिका इराणबरोबर अणुकराराची घोषणा करण्याच्या तयारीत असताना, आखाती देशांनी इस्रायलबरोबरील आपले हे लष्करी सहकार्य अधिकच दृढ व व्यापक करण्यासाठी पावले उचलली आहे. तर दुसर्‍या बाजूला इराणकडून इस्रायलच्या विरोधात खडे टाकलेल्या आक्रमक पॅलेस्टिनी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व पैसा पुरवित आहे.

विशेषतः इराणच्या हमासबरोबरील सहकार्याकडे इस्रायल अत्यंत सावधपणे पाहत आहे. अशा परिस्थितीत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हमासचे नेते इस्माईल हनिया यांच्याबरोबरील चर्चेत केलेले दावे लक्ष वेधून घेणारे आहेत. त्याचवेळी इराणच्या रिव्होल्युनशरी गार्डस्ने पॅलेस्टिनींना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊन इस्रायलला खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे. इस्रायलच्या विरोधात शस्त्रास्त्रे पुरविणार्‍या इराणला याची जबर किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा इस्रायलने दिला होता. आपल्याकडील लेझर यंत्रणेची चाचणी करून इस्रायलने क्षेपणास्त्रांच्या मार्‍याचा आपल्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही, याची स्पष्ट जाणीव आपल्या शत्रूंना करून दिलेली आहे. यामुळे इराणच्या विरोधात खडे ठाकलेल्या आखाती देशांचा इस्रायलच्या सामर्थ्यावरील विश्‍वास अधिकच वाढू शकेल.

leave a reply