चीन पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या शेकडो पट घातक विषाणू विकसित करीत आहे

- पाश्‍चिमात्य शोध पत्रकाराचा दावा

न्यूयॉर्क – ‘मानवजातीचा घात करणारे विषाणू चीन तयार करीत आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जगभरात थैमान घालणार्‍या कोरोनापेक्षाही हे विषाणू शेकडो पटीने भीषण असतील, असा दावा शोध पत्रकार अँथनी क्लॅन यांनी केला. कोरोनाचे उगमस्थान म्हणून कुख्यात असलेली चीनची वुहान प्रयोगशाळा यात सहभागी आहे. चीन या संहारक विषाणूची निर्मिती पाकिस्तानात करीत असल्याचा आरोप क्लॅन यांनी केला.

विषाणूशोधपत्रकारितेसाठी ख्यातनाम असलेल्या अँथनी क्लॅन यांनी ‘द क्लॅक्सॉन’ या संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखामध्ये चीन कोरोनापेक्षाही विघातक विषाणू तयार करीत असल्याचे म्हटले आहे. चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आणि पाकिस्तानचे लष्कर या विषाणूच्या निर्मितीत सहभागी आहेत. यासाठी चीनने पाकिस्तानमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय प्रयोगशाळा उभारली आहे, अशी माहिती क्लॅन यांनी दिली. चीनची ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ आणि पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेली ‘डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन-डिईएसटीओ’ यामध्ये सहभागी आहे.

या प्रयोगशाळेत तयार केला जाणारा विषाणू कोरोनापेक्षाही शेकडो पट अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक असल्याचा दावा क्लॅन यांनी केला. चीन व पाकिस्तान संयुक्तपणे चालवत असलेली ही लष्करी प्रयोगशाळा ‘बायो सेफ्टी लेव्हल ४’ या प्रकारातील आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार चार मुख्य श्रेणींमध्ये प्रयोगशाळांची निर्मिती केली जाते. यापैकी चौथ्या प्रकारच्या प्रयोगशाळांमध्ये धोकादायक आणि संसर्गजन्य विषाणूवर काम केले जाते, अशी माहिती देऊन क्लॅन यांनी पाकिस्तानातील चीनच्या प्रयोगशाळेबद्दल इशारा दिला.

विषाणूचीनच्या वुहान प्रयोगशाळेतील जैव संशोधक पाकिस्तानात भीषण विषाणू तयार करीत असल्याच्या आरोपांना दुजोरा मिळू लागला आहे. चीन व पाकिस्तानच्या या लष्करी प्रयोगशाळेची दखल न घेता त्याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे भयावह परिणाम येत्या काळात समोर येतील. सर्‍या जगाला याचा धोका संभवतो, असा इशारा सिंगापूरस्थित अभ्यासगटाचे वरिष्ठ विश्लेषक रायन क्लार्क यांनी दिला. हा विषाणू म्हणजे पाकिस्तानने तयार केलेले बायो वेपन अर्थात जैविक शस्त्र असल्याचा आरोप क्लार्क यांनी केला. पाकिस्तानप्रमाणे चीनच्या कुनमिंग येथील प्रयोगशाळाही अशा विषाणूची निर्मिती सुरू आहे. त्याकडेही आंतरराष्ट्रीय संघटना दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका क्लार्क यांनी ठेवला.

गेल्या दोन वर्षापासून जगभरात थैमान घालणार्‍या कोरोनाने आत्तापर्यंत साठ लाखाहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. तर कोट्यावधी जण आजही या कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीअंटने बाधित झालेले आहेत. चीनची वुहान प्रयोगशाळा या कोरोनाचे उगमस्थान असल्याचा आरोप याआधी झाला होता. चीनमधून पलायन केलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचे दावे केले होते. तर कोरोना म्हणजे चीनचे जैविक हत्यार असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

leave a reply