इस्रायली संरक्षण कंपनीवर इराणच्या हॅकर्सचा हल्ला

- महिन्यातील दुसरा मोठा सायबर हल्ला

तेल अविव – अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येचा सूड घेण्याची धमकी देणार्‍या इराणने इस्रायलवर सायबर हल्ले सुरू केले आहेत. इराणशी संलग्न असलेल्या ‘पे २ की’ हॅकर्सच्या गटाने रविवारी इस्रायलच्या संरक्षण कंपनीची माहिती हॅक करून ती डार्क वेबवर प्रसिद्ध केली. इराणसंलग्न हॅकर्सच्या गटानेच या हल्ल्याची माहिती उघड केली. गेल्या दोन आठवड्यात इस्रायली कंपन्यांवर झालेला हा दुसरा मोठा सायबर हल्ला ठरतो. दरम्यान, इराणी हॅकर्सनी हल्ला चढविलेल्या इस्रायलच्या संरक्षण कंपनीशी भारत, अमेरिका, युरोपिय महासंघ जोडलेले असल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

इस्रायलच्या ‘इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रिज्’शी (आयएआय) संलग्न असलेल्या ‘एल्टा सिस्टिम्स’ या कंपनीचा सर्व्हर इराणच्या ‘पे २ की’ गटाने हॅक केला. रविवारी रात्री इराणी हॅकर्सनी या सायबर हल्ल्याची माहिती उघड केली. या सायबर हल्ल्यामध्ये इस्रायली कंपनीच्या सिनिअर प्रोजेक्ट डेव्हलपरसह कर्मचार्‍यांची माहिती डार्क वेबवर प्रसिद्ध केली. यामध्ये कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पासवर्डचाही समावेश होता. इस्रायलचे इन्फॉर्मेशन सायन्टिस्ट कॅरीन नॅहोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणी हॅकर्सनी शेकडो संवेदनशील माहिती डार्क वेबवर पोस्ट केली.

इस्रायलची ‘आयएआय’ ही संरक्षण क्षेत्रात जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. प्रवासी तसेच लष्करी विमाने, ड्रोन्स, रडार, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे तसेच वैमानिकी आणि अंतराळ तंत्रज्ञानाची निर्मिती ‘आयएआय’कडून केली जाते. यामध्ये बराक क्षेपणास्त्र, हेरॉन ड्रोन्स आणि एल्टा रडार या आघाडीच्या संरक्षण साहित्यांचा समावेश आहे. भारत, अमेरिका तसेच युरोपिय महासंघांची संरक्षणदले गेल्या काही वर्षांपासून इस्रायलच्या ‘आयएआय’ तसेच एल्टा सिस्टिमशी जोडलेली आहेत. त्यामुळे इराणच्या हॅकर्सनी इस्रायलच्या संरक्षण निर्मिती कंपनीवर केलेल्या सायबर हल्ल्याचे महत्त्व वाढले आहे.

इस्रायलच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित ‘एल्टा सिस्टिम’वरील हा सर्वात मोठा सायबर हल्ला मानला जातो. याआधी इराणच्या हॅकर्सनी इस्रायलच्या ४० हून अधिक लॉजिस्टिक्स कंपन्यांना लक्ष्य केले होते. तेल अविव शेअर बाजाराशी संबंधित ‘अ‍ॅमिटल डाटा’ या कंपनीचा सर्व्हरही हॅक केला होता. या सायबर हल्ल्यांचे थेट संबंध इराणशी जोडलेले आहेत. या वर्षात इस्रायल सरकार व लष्कराशी संबंधित संकेतस्थळ किंवा सर्व्हर्सवर एकूण पाच मोठे सायबर हल्ले झाले आहेत. यापैकी वर्षाच्या सुरुवातीला इस्रायलच्या जलविभागावर झालेला सायबर हल्ला मोठा होता.

यानंतर मे महिन्यात इस्रायलनेही इराणच्या ‘बंदर अब्बास’ या बंदरावर सायबर हल्ला झाल्याचा आरोप इराणने केला होता. येथील इंधनविषयक कंपनीचे संकेतस्थळ हॅक केल्याचा ठपका इराणने ठेवला होता. गेल्या काही वर्षांपासून इस्रायल आणि इराण यांच्यात सायबर संघर्ष सुरू आहे. याआधी इराणच्या अणुप्रकल्पावर इस्रायलने ‘स्टक्सनेट’चा सायबर हल्ला घडविल्याचा ओरडा इराणने केला होता. या सायबर हल्ल्याने इराणच्या अणुप्रकल्पातील हजारो सेंट्रिफ्युजेस निकामी झाली होती व इराणचा अणुकार्यक्रम मागे पडला होता. त्यानंतरही इराणकडून इस्रायलवर सायबर हल्ल्याचे आरोप झाले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षभरात इस्रायल आणि इराणमधील सायबर युद्ध अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहे. अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येनंतर संतापलेला इराण लष्करी कारवाई ऐवजी सायबर हल्ल्याच्या मार्गाने इस्रायलला लक्ष्य करील, असा दावा केला जातो. इराणच्या या सायबर हल्ल्यांवर इस्रायलकडूनही प्रतिक्रिया उमटू शकते.

leave a reply