नायजेरियात ‘आयएस’च्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांचा बळी

अबुजा – नायजेरियाच्या बॉर्नो प्रांतात ‘आयएस’ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवानांसह एक महिलेचा बळी गेला आहे. दहशतवाद्यांनी ३५ जणांचे अपहरण केल्याचेही समोर आले आहे. नायजेरियाच्या उत्तरेकडील प्रांतांमध्ये गेले काही दिवस सातत्याने दहशतवादी हल्ले व अपहरणाच्या घटना घडत असून त्या रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे नव्या घटनेतून दिसून येते. दरम्यान, १० दिवसांपूर्वी कात्सिना प्रांतातील शाळेतून अपहरण करण्यात आलेल्या ३००हून अधिक विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.

नायजेरियातील उत्तरेकडील प्रांतांमध्ये ‘बोको हराम’ व ‘आयएस’ या दहशतवादी संघटनांसह सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. जवळपास प्रत्येक आठवड्यात नवे दहशतवादी हल्ले व अपहरणाच्या घटना समोर येत असून राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार निष्क्रिय असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सरकारने उत्तरेकडील भागात लष्करासह सुरक्षायंत्रणांची तैनाती करून दहशतवादी गट व दरोडेखोरांच्या टोळ्यांचा बिमोड केल्याचे दावे वारंवार केले होते. मात्र लष्करावर होणारे हल्ले व अपहरणाच्या घटनांनी हे दावे फोल ठरविले आहेत.

शुक्रवारी ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी बोर्नो प्रांताची राजधानी मैदुगुरीनजिक ३५ जणांचे अपहरण केले. यावेळी दहशतवाद्यांनी लष्करी गणवेश घालून खोटी तपासणी चौकी उभी केली होती. चौकीवर आलेली बस अडवून त्यातील प्रवाशांचे अपहरण केले. यावेळी झालेल्या चकमकीत एक महिला ठार झाली असून पळण्याचा प्रयत्न करणारे काही प्रवासी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर शनिवारी लष्करी पथकाला लक्ष्य करण्यात आले.

बोर्नो प्रांतातील माफामध्ये ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी ‘रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड’च्या (आरपीजी) सहाय्याने लष्करी पथकावर हल्ला केला. यात लष्करी पथकातील गाडी उडविण्यात आली असून त्यातील पाच जवानांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन गाड्या ताब्यात घेतल्याचा दावाही सूत्रांनी केला. नायजेरियात ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेपासून वेगळा झालेल्या गट ‘आयएस’शी संलग्न असून हा गट प्रामुख्याने लष्कर व सुरक्षायंत्रणांना लक्ष्य करीत आहे. शनिवारी ‘बोको हराम’च्या आत्मघातकी महिला हल्लेखोराने घडविलेल्या स्फोटात तिघांचा बळी गेला आहे. बोर्नो प्रांतातील कोंडुगा शहरात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

शनिवारी कत्सिना प्रांतात फुलानी बंडखोरांच्या गटाने ८० विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटनाही उघड झाली. मात्र या घटनेनंतर काही तासातच स्थानिक गट व सुरक्षायंत्रणांनी विद्यार्थ्यांची सुटका करण्यात यश मिळविल्याची माहिती देण्यात आली. अवघ्या १० दिवसांच्या अवधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे अपहरण होण्याची ही दुसरी घटना ठरली आहे.

दरम्यान, ११ डिसेंबरला कात्सिना प्रांतातील शाळेतून अपहरण झालेल्या ३४४ विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. कत्सिना प्रांतातील कंकारा भागात असलेल्या ‘गर्व्हर्मेंट सायन्स सेकंडरी स्कूल’मधून शेकडो विद्यार्थ्यांचे अपहरण झाले होते. हे अपहरण ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता सुटकेनंतर सदर अपहरण ‘बोको हराम’ऐवजी स्थानिक दरोडेखोरांनी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेवरून राष्ट्राध्यक्ष बुहारी यांच्यासह स्थानिक यंत्रणांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

leave a reply