इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी रशियामध्ये दाखल

- इराण-रशिया सहकार्य व्यापक करणार

रईसीतेहरान – ‘इराणला आपल्या सर्व शेजारी देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करून ते मजबूत करायचे आहेत. विशेषत: रशियाबरोबर राजकीय, आर्थिक आणि व्यापारी आघाडीवरचे सहकार्य अधिक भक्कम करायचे असून आपला हा दौरा त्यासाठी नवा टप्पा ठरेल’, असा दावा इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केला. रशियाच्या दौर्‍यावर असलेले राष्ट्राध्यक्ष रईसी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार आहेत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी दोन दिवसांच्या रशिया दौर्‍यावर असून ते बुधवारी रशियन राजधानी मॉस्कोमध्ये दाखल झाले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी राष्ट्राध्यक्ष रईसी यांना रशिया भेटीचे आमंत्रण दिले होते. या दौर्‍यात उभय देशांमधील राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती इराणने जाहीर केले. राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी रशियाला रवाना होण्याआधी दिलेल्या माहितीत, आपला हा दौरा रशियाबरोबरच्या सहकार्याला कलाटणी देणारा ठरेल, असा दावा केला.

‘इराण आणि रशिया, या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे, सामर्थ्यशाली आणि प्रभावशाली देश आहेत. अशा या दोन्ही देशांमधील सहकार्य आणि चर्चा या क्षेत्रातील सुरक्षा आणि आर्थिक तसेच व्यापारी संबंध सुधारण्यासाठी प्रभावी ठरू शकतात’, असे राष्ट्राध्यक्ष रईसी म्हणाले. तर ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’बाबत बोलताना इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाबरोबरच्या व्यापारी सहकार्याचा उल्लेख केला.

रईसीदोन्ही देशांमधील व्यापारी आणि आर्थिक सहकार्य समाधानकारक नसल्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले. अशा परिस्थितीत, पूर्व युरेशियन महासंघात रशियाची महत्त्वाची भूमिका इराणसाठी सहाय्यक ठरेल, असा दावा इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. ‘एससीओमधील सहभागानंतर रशियाबरोबरचे संबंध व्यापारी आणि आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी आवश्यक ठरतील’, असे रईसी म्हणाले. रशिया आणि इराण या दोन्ही देशांनी २० वर्षांसाठी सहकार्य प्रस्थापित केले. गेल्या वर्षीच हे सहकार्य संपुष्टात आले. हे सहकार्य आणखी पाच वर्षांसाठी वाढविण्याची मागणी इराणने केली होती. यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ताजिकिस्तानातील एससीओच्या बैठकीत इराणचे राष्ट्राध्यक्ष रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार होते. पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, रशियन राष्ट्राध्यक्ष या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे आपल्या या रशिया दौर्‍यात इराणचे राष्ट्राध्यक्ष सदर सहकार्याचे नुतनीकरण करणार असल्याचा दावा इराणी माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, इराण हा आखातातील इंधनसंपन्न आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि ओपेकचे सदस्य देश असलेल्या सौदी अरेबिया व इतर अरब मित्रदेशांबरोबर रशियाचे इंधनाच्या अतिरिक्त निर्मितीवर मतभेद निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत, इराणच्या राष्ट्राध्यक्षांची ही रशिया भेट महत्त्वाची ठरते.

leave a reply