वणवे साथीच्या रोगाप्रमाणे फैलावत आहेत

वणवेवॉशिंग्टन – जगाच्या विविध भागांमध्ये पसरणारे वणवे साथीच्या रोगाप्रमाणे फैलावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी साथीचे रोग वणव्याप्रमाणे पसरत असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आता वणव्यांना साथीच्या रोगाची उपमा देण्यात आली आहे. अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या लेखात, वणवे रोखण्यासाठी कोरोनाप्रमाणे प्रतिबंधक उपायांची गरज असल्याचेही म्हटले आहे.

गेल्या काही वर्षात जगातील अनेक भागांमध्ये मोठे व प्रचंड हानी घडविणारे वणवे पेटल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, कॅनडा, रशियातील सैबेरिया, ब्राझिलमधील ऍमेझॉन जंगलाचा भाग, युरोपिय देश, ऑस्ट्रेलिया व तुर्की यासारख्या भागांमध्ये भयावह वणवे भडकल्याचे समोर आले होते. या वणव्यांमध्ये कोट्यावधी एकराचे जंगल क्षेत्र जळून खाक झाले होते.

वणवेया वणव्यांमध्ये काही शहरे व मानवी वस्तीचा भाग असलेल्या परिसरालाही मोठा फटका बसला होता. कॅनडासारख्या देशात लिटन नावाचे शहर पूर्णपणे जळाले होते. रशियात पेटलेल्या वणव्यांवर चिंता व्यक्त करताना राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सर्वात मोठी आपत्ती असे म्हटले होते. रशियातील वणवे नियंत्रणात आणण्यासाठी ‘क्लायमेट इंजिनिअरिंग’ तंत्राचा वापरही करण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी हवामानबदल हे वणव्याचे कारण असल्याचे दावे केले आहेत. त्याचवेळी पुढील काळात याचे प्रमाण व व्याप्ती वाढत राहिल, असे इशारेही दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, वणव्यांची तुलना साथीच्या रोगाशी होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. गेल्या वर्षी अमेरिकेच्या ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक स्टिव्हन पाइन यांनी, अमेरिका, ब्राझिल व ऑस्ट्रेलियातील वणव्यांची तुलना करताना हे वणवे साथीच्या रोगाच्या उद्रेकांप्रमाणे भडकत असल्याचे म्हटले होते.

leave a reply