इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

- इराणने हत्येचा दावा फेटाळला

तेहरान – इराणच्या कुद्स फोर्सेचे वरिष्ठ अधिकारी कर्नल खोदायी यांच्या हत्येला दहा दिवस उलटत नाही तोच, कुद्स फोर्सेसच्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घराच्या बाल्कनीतून पडल्यामुळे कर्नल अली इस्माईलझादेह यांचा बळी गेल्याचा दावा इराणी वृत्तवाहिन्या करीतआहेत. कर्नल इस्माईलझादेह शत्रूसाठी हेरगिरी करीत असल्याचे उघड झाले होते. तसेच कर्नल इस्माईलझादेह हे कर्नल खोदाई यांच्याशी संबंधित असल्याची माहिती युरोपमधील आपल्या सूत्रांनी दिल्याचा दावा ब्रिटीश-इराणी वृत्तसंस्थेने केला.

संशयास्पद मृत्यू30 मे रोजी राजधानी तेहरानपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या इराणच्या कराज शहरात कर्नल अली इस्माईलझादेह यांचा अपघाती मृत्यू झाला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत, कर्नल इस्माईलझादेह यांचा घराच्या बाल्कनीतून कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. कर्नल इस्माईलझादेह यांनी आत्महत्या केल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली. आपल्या पत्नीपासून वेगळे झाल्यापासून कर्नल इस्माईलझादेह वैफल्यग्रस्त बनले होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या अधिकाऱ्यांनी केला.

पण ब्रिटीश-इराणी वृत्तसंस्थेने युरोपमधील आपल्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबत नवा दावा केला आहे. कर्नल इस्माईलझादेह हे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या कुद्स फोर्सेसमधील ‘युनिट 840’साठी काम करीत होते. सदर युनिट म्हणजे कुद्स फोर्सेसमधील अतिशय गोपनीय पथक म्हणून ओळखले जाते. या पथकातील कुठल्याही अधिकाऱ्याचे फोटोग्राफ्स देखील प्रसिद्ध केले जात नाहीत. याच पथकाचे वरिष्ठ अधिकारी व कर्नल इस्माईलझादेह यांचे सहकारी कर्नल खोदायी यांची दहा दिवसांपूर्वी राजधानी तेहरानमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

इराणच्या कुद्स फोर्सेसचे माजी प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी यांचे विश्वासू म्हणून कर्नल खोदायी यांचा उल्लेख केला जातो. कर्नल खोदायी यांच्याकडे जगभरातील इस्रायलींच्या हत्येची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये कर्नल खोदायी यांच्या नेतृत्वाखाली कुद्स फोर्सेसने भारत, तैवान, सायप्रस आणि जॉर्जिया या देशांमध्ये असे हल्लेघडविले होते. त्यामुळे त्यांची हत्या ही इराणच्या कुद्स फोर्सेसाठी मोठा हादरा ठरला होता.

कर्नल खोदायी यांच्या हत्येसाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ जबाबदार असल्याचा आरोप इराणच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी केला होता. यासाठी इराणमधील मोसादच्या एजंट्सनी सहाय्य पुरविल्याचे दावेही करण्यात आले होते. याचा शोध सुरू असताना ‘युनिट 840’च्याच कर्नल इस्माईलझादेह यांचा अपघाती मृत्यू संशय वाढविणारा असल्याचे ब्रिटीश-इराणी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. खोदायी यांच्या हत्येचे धागेदोरे इस्माईलझादेह यांच्याशी जोडलेले असण्याची शक्यता सदर वृत्तसंस्थेने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने वर्तविली आहे. त्यामुळे इस्माईलझादेह यांच्या अपघाती मृत्यूकडेही संशयाने पाहिले जावे, असे या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

leave a reply