इराणच्या बंडखोरांनी वेबसाईट्स, सीसीटीव्ही हॅक केले

- इराणमधील राजवटविरोधी बंडखोर नेते इस्रायलमध्ये दाखल

वॉशिंग्टन/जेरूसलेम – इराणला आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीपासून मुक्त करून इराणमध्ये लोकशाहीची मागणी करणाऱ्या ‘मुजाहिदीन-ए-खल्क’ गटाने गुरुवारी इराणमध्ये सर्वात मोठा सायबर हल्ला केला. या बंडखोर गटाने इराणच्या राजवटीशी संबंधित वेबसाईट्स आणि पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरा हॅक केले. यामुळे काही काळासाठी इराणच्या यंत्रणा बाधित झाल्या होत्या. इराणमध्ये ही घडामोड सुरू असताना, अमेरिकास्थित इराणी बंडखोरांचे नेते इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इराणमधील आयातुल्लांच्या राजवटीविरोधात बंड पुकारण्यासाठी इस्रायलने सहाय्य करावे, अशी मागणी हे बंडखोर नेते करीत आहेत.

सीसीटीव्हीगुरुवारी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्याशी संबंधित तसेच इराण सरकारच्या वेबसाईट्सवर सायबर हल्ला झाला. आयातुल्ला खामेनी यांच्या फोटोवर उलट्यासुलट्या रेघोट्या ओढून त्यावर ‘मुजाहिदीन-ए-खल्क’ या बंडखोर संघटनेच्या नेत्यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये खल्क संघटनेचे संस्थापक मसूद रजावी आणि या संघटनेच्या सध्याच्या प्रमुख मरियम रजावी यांच्या फोटोचा समावेश होता. याबरोबर सदर वेबसाईट्सवर इराणमधील खामेनी यांची राजवट उलथण्यासाठी बंड पुकारण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन करण्यात आले होते.

याशिवाय राजधानी तेहरानचे रस्ते, महत्त्वाची ठिकाणांवरील जवळपास पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरा देखील या बंडखोरांनी हॅक केल्याचा दावा केला. इराणचे सरकार किंवा लष्करी गटांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण इराणमधील पत्रकारांच्या गटाने अशा प्रकारचा सायबर हल्ला झाल्याची कबुली दिली. गेल्या पाच महिन्यांमध्ये इराणच्या राजवटीवर झालेला हा दुसरा सायबर हल्ला ठरतो. याआधी जानेवारी महिन्यात याच बंडखोर गटांनी आयातुल्ला खामेनी यांच्या संकेतस्थळाचा ताबा घेतला होता. त्यानंतर खामेनी यांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी प्रसिद्ध केली होती. यामुळे इराणमध्ये तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, मुजाहिदीन-ए-खल्क ही बंडखोर संघटना इराणवर सायबर हल्ले करीत असताना, अमेरिकेत राहणारे इराणी बंडखोर नेत्यांचे पथक गुरुवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. या नेत्यांनी इराणमधील खामेनी यांची राजवट उलथण्यासाठी इस्रायलकडे सहाय्याची मागणी केली. 2009 सालाप्रमाणे इराणला हादरवून टाकणारे राजवटविरोधी आंदोलन पुकारण्याचा दावा या बंडखोरांच्या गटाने केला.

leave a reply