गोलान टेकड्या स्वतंत्र होईपर्यंत इराणचा इस्रायलविरोधी संघर्ष सुरूच राहील

- इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी

गोलान टेकड्यातेहरान – अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्या हत्येमुळे खवळलेला इराण दरदिवशी इस्रायल व अमेरिकेला धमकी देत आहे. ‘इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान टेकड्या स्वतंत्र होईपर्यंत इराणचा इस्रायलविरोधी संघर्ष सुरूच राहिल. या संघर्षात इराण सिरियन लष्कराला पूर्ण सहाय्य करील’, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी घोषित केले. तर इस्रायल जगाच्या नकाशावर नसेल तर पूर्ण जग सुरक्षित होईल, अशी चिथावणीखोर विधाने इराणच्या दुसऱ्या एका वरिष्ठ नेत्याने केली आहेत.

सिरियाचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री फैझल मेकदाद यांनी मंगळवारी इराणचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी तसेच इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीचे संदर्भ राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सिरियातील अस्साद राजवटीला इराणचा कायम पाठिंबा असेल, असे जाहीर केले. तसेच इस्रायल आणि सिरियामध्ये विभागला गेलेल्या गोलान टेकड्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.

गोलान टेकड्या

‘सिरिया हा इराणचा धोरणात्मक सहकारी देश आहे. त्यामुळे इस्रायलच्या घुसखोरी आणि दहशतवादाविरोधात सिरियाने सुरू केलेल्या संघर्षाला पूर्ण यश मिळत नाही, तोपर्यंत इराण सिरियाच्या बरोबर आहे. गोलान टेकड्या तसेच इतर भूभाग इस्रायलपासून स्वतंत्र करणे सिरिया तसेच इराणचे समान ध्येय असून हे ध्येय गाठेपर्यंत इस्रायलविरोधातील संघर्ष सुरूच राहणार आहे’, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केली. त्याचबरोबर गेल्या वर्षी गोलान टेकड्यांवर इस्रायलचा सार्वभौम अधिकार असल्याचे जाहीर करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही रोहानी यांनी टीका केली.

गोलान टेकड्या

यानंतर मेकदाद यांनी इराणच्या ‘सुप्रिम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’चे प्रमुख अली शामखानी यांची भेट घेतली. इस्रायल जगाच्या नकाशावर नसेल, तर पूर्ण जग सुरक्षित होईल, यात शंकाच नसल्याचे चिथावणीखोर विधान शामखानी यांनी केले. इस्रायल हा रक्तपात करणारा आणि अमानवी देश असून आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलवर कारवाई करावी, असे आवाहन शामखानी यांनी केले. तर अमेरिकेची सिरियातील सैन्यतैनाती इस्रायलच्या सुरक्षेसाठी आणि इंधनाच्या लूटीसाठी असल्याचा आरोप शामखानी यांनी केला. अमेरिका सिरियातील दहशतवाद्यांना समर्थन करीत असून अमेरिकेची ही तैनाती संपुष्टात आणायला हवी, असा ठपका शामखानी यांनी ठेवला. मंगळवारी सकाळी सिरियाच्या गोलान भागात मंगळवारी सकाळी स्फोट झाल्याची बातमी सिरियातील वृत्तवाहिनीने दिली. कुनित्रा प्रांतात मोठे स्फोट ऐकू आल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इस्रायलच्या लष्कराने सिरियात पुन्हा हल्ले चढविले असावे, अशी शंका व्यक्त केली जाते. इस्रायली माध्यमांनी देखील या स्फोटाची बातमी दिली. पण सिरियन सरकारशी संलग्न असलेल्या माध्यमांनी या स्फोटाचे वृत्त फेटाळले आहे.

दरम्यान, याआधीही इराणने इस्रायलच्या विनाशाच्या धमक्या दिल्या होत्या. त्याचबरोबर सिरियाच्या गोलान भागातील इराणचे लष्कर तसेच इराणसंलग्न हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांच्या हालचाली वाढल्या होत्या. इस्रायलने या भागात हल्ले चढवून इराण, हिजबुल्लाहचे तळ तसेच जवान व दहशतवाद्यांना ठार केले होते.

leave a reply