तुर्कीची लिबियन बंडखोरांना गंभीर परिणामांची धमकी

- लिबियात पुन्हा संघर्ष भडकण्याची शक्यता

बंडखोरबेंगाझी – लिबियातील हफ्तार बंडखोरांनी संशयित जहाजावर केलेल्या कारवाईमुळे तुर्की खवळला आहे. तुर्कीच्या जहाजावर कारवाई करणाऱ्या हफ्तार बंडखोरांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी तुर्कीने दिली. तर लिबियातील संघर्षबंदीची पर्वा न करता तुर्कीने लिबियात कंत्राटी सैनिक आणि दहशतवादी रवाना करणे सुरूच ठेवल्याचा आरोप सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला आहे. लिबियातील कंत्राटी सैनिकांची छुपी तैनाती आणि तुर्कीने हफ्तार बंडखोरांना दिलेल्या या धमकीमुळे लिबियात पुन्हा संघर्षाचा भडका उडण्याची दाट शक्यता असल्याचा दावा केला जातो.

तुर्कीचा पाठिंबा असलेले लिबियातील सराज यांचे जहालमतवादी सरकार आणि जनरल खलिफा हफ्तार बंडखोर गटांमध्ये ऑक्टोबर महिन्यात संघर्षबंदी झाली होती. यानंतर लिबियाच्या दोन्ही गटांमधील संघर्ष थांबला होता. पण या संघर्षबंदीच्या आड तुर्कीने लिबियात कंत्राटी सैनिक, दहशतवादी घुसविल्याचा तसेच पुढच्या आठवड्यात आणखी काही कंत्राटी सैनिक तैनात करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला. तुर्कीने नोव्हेंबर महिन्यात 18 हजार सिरियन आणि 2500 ट्युनिशियन कंत्राटी सैनिक लिबियात रवाना केले होते. यामध्ये 350 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याची चिंता या संघटनेने व्यक्त केली.

बंडखोर
यापैकी किमान 10 हजार कंत्राटी सैनिक अजूनही लिबियामध्ये तैनात असल्याचा दावा सिरियन मानवाधिकार संघटनेने केला. या व्यतिरिक्त तुर्की आणखी काही कंत्राटी सैनिकांना लिबियात रवाना करण्याच्या तयारीत असल्याचा दावाही या मानवाधिकार संघटनेने दोन दिवसांपूर्वी केला होता. तुर्की लष्करी विमानांचा वापर करुन या कंत्राटी सैनिकांना लिबियात उतरवित असल्याचा आरोप आखातातील एका वृत्तसंस्थेने केला. याआधीही तुर्कीने प्रवासी विमानांद्वारे सिरियातील दहशतवाद्यांना लष्करी पोषाखात लिबियात तैनात केल्याचे व्हिडिओ समोर आले होते.

सिरियातील मानवाधिकार संघटनेने केलेला हा आरोप ताजा असताना, तुर्कीचे मालवाहू जहाज संशयितरित्या लिबियाच्या सागरी हद्दीत दाखल झाले. हफ्तार बंडखोरांनी सावध करून आणि वारंवार विचारणा करूनही या जहाजाने प्रत्युत्तर न दिल्यामुळे हफ्तार बंडखोरांनी सदर जहाज ताब्यात घेतले. हफ्तार बंडखोरांनी केलेल्या या कारवाईवर तुर्की कमालीचा संतापला आहे. ‘लिबियामध्ये तुर्कीच्या हितसंबंधांना लक्ष्य करणाऱ्यांना लवकरच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’, अशी धमकी तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. याआधी तुर्की मालवाहू जहाजांचा वापर करुन लिबियातील सराज सरकारला शस्त्रास्त्रांची तस्करी करुन आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप फ्रान्स, इजिप्त, युएई या देशांनी केला होता. हफ्तार बंडखोरांनी त्रिपोली बंदरात उभ्या असलेल्या तुर्कीच्या जहाजावर हल्लेही चढविले होते. तुर्कीने शस्त्रतस्करीचे आरोप फेटाळले होते. पण लिबियातील संघर्षात सराज सरकारने तुर्कीच्या ड्रोन्सचा तसेच क्षेपणास्त्रांचा वापर केल्यानंतर तुर्कीचे पितळ उघडे पडले होते.

बंडखोर

तुर्कीच्या या स्फोटक हालचालींवर पाश्‍चिमात्य तसेच आखाती व आफ्रिकी माध्यमे चिंता व्यक्त करीत आहेत. तुर्कीमुळे लिबियातील संघर्षबंदी धोक्यात येऊ शकते. असे झाले तर तुर्की व लिबियातील सराज सरकारच्या विरोधात हफ्तार बंडखोरांना सहाय्य करण्यासाठी रशिया, फ्रान्स, इजिप्त, युएई या देशांची आघाडी पुन्हा उभी राहिल. यामुळे लिबियात नव्याने संघर्षाचा भडका उडेल, अशी चिंता व्यक्त केली जाते.

दरम्यान, लिबियाप्रमाणे तुर्कीने भारताच्या विरोधात संघर्ष पुकारण्यासाठी पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये कंत्राटी सैनिक व दहशतवादी रवाना करण्याची तयारी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यासाठी तुर्की दहशतवाद्यांना मोठी रक्कम देत असल्याचेही समोर आले होते. तर तुर्कीने आर्मेनियाविरोधातील संघर्षातही सिरियातील दहशतवाद्यांना अझरबैजानच्या बाजूने लढण्यासाठी उतरविले होते.

leave a reply