पर्शियन आखाताच्या सुरक्षेसाठी इराणचे नौदल सक्षम आहे

-इराणच्या नौदलप्रमुखांची घोषणा

iran-navyतेहरान – ‘सागरीसीमांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी इराणचे नौदल सक्षम आहे. त्याचबरोबर परदेशी नौदलाच्या अनुपस्थितीतही इराण पर्शियन आखाताची सुरक्षा करू शकतो’, अशी घोषणा नौदलप्रमुख रिअर ॲडमिरल शाहराम इरानी यांनी केली. इराणचे नौदलप्रमुख आपल्या सज्जतेबाबत बोलत असताना, अमेरिकेतील संकेतस्थळाने पर्शियन आखातात गस्त घालणाऱ्या आपल्या देशाच्या विमानवाहू युद्धनौकांना इशारा दिला. इराणचे टॉर्पेडो अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांना लक्ष्य करू शकतात, असा दावा या संकेतस्थळाने केलाआहे.

iran-submarineआत्तापर्यंत इराणच्या नौदलाची क्षमता वेगवान गस्तीनौका आणि छोट्या आकाराच्या विनाशिका व पाणबुड्यांपर्यंत मर्यादित होती. पण गेल्या काही वर्षांपासून इराणने आपल्या नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी वेगाने पावले टाकली आहेत. यासाठी इराणने आपल्या नौदलाच्या ताफ्यात ड्रोन्सना सहभागी केल्याचे उघड झाले होते. तर मोठ्या आकाराच्या विनाशिकांची निर्मिती केल्याची घोषणा इराणने केली होती. इस्रायलच्या माध्यमांनी इराणच्या बंदरात विनाशिकाच्या निर्मितीबाबत सुरू असलेल्या कामकाजाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते.

इराणने याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण नौदलप्रमुख रिअर ॲडमिरल शाहराम इरानी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, इराणचे नौदल पर्शियन आखातात नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार असल्याचा दावा केला. इराणचे नौदल आपल्या सागरीसीमांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहे. शत्रूदेशांनी प्रयत्न करूनही इराणच्या नौदल सज्जतेवर परिणाम झाला नाही, असा दावा रिअर ॲडमिरल इरानी यांनी केला.

us-aircraft-carrierत्याचबरोबर पर्शियन आखाताच्या सुरक्षेसाठी देखील इराणचे नौदल सज्ज असल्याची आठवण नौदलप्रमुख इरानी यांनी करुन दिली. त्याचबरोबर इराणच्या नौदलप्रमुखांनी पर्शियन आखाताच्या सुरक्षेसाठी या क्षेत्रातील देशांना सहकार्याचे आवाहन केले. ‘आखाती देशांचे सहकार्य या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी भक्कम स्तंभ म्हणून काम करू शकते’, असे इरानी म्हणाले. असे झाले तर पर्शियन आखातात परदेशी नौदलांच्या तैनातीचीही आवश्यकता लागणार नसल्याची घोषणा नौदलप्रमुख इरानी यांनी केली.

दरम्यान, ‘19फोर्टीफाईव्ह’ या अमेरिकी संकेतस्थळाने इराणच्या नौदल सामर्थ्याबाबत अमेरिकेला इशारा दिला. ‘अमेरिकेचे संरक्षणदल सर्वच आघाड्यांवर उत्तम दर्जाचे आहे, हे नाकारता येणार नाही. पण अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेला जलसमाधी देण्याची क्षमता इराणकडे आहे, हे देखील विसरता येणार नाही. इराणच्या नौदलातील किलो श्रेणीतील पाणबुड्यांचे टॉर्पेडो अमेरिकी विमानवाहू युद्धनौकेला मोठे नुकसान करू शकतात’, असे या संकेतस्थळाने बजावले. त्याचबरोबर जगभरातील अमेरिकेच्या हितसंबंधाना लक्ष्य करण्यासाठी इराणकडे लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे असल्याचा दावा या संकेतस्थळाने केला आहे.

leave a reply